बंद बार, परमिट रूमचे करायचे काय?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

दुकान स्‍थलांतरासाठी मालकांची पळापळ; रस्‍ते हस्तांतरात प्रचंड अडथळे

कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेली दारू दुकाने, परमिट रूम, वाइन शॉपसह कंट्री लिकरची दुकाने बंद झाली. यावर अजूनही निर्णय झालेला नाही आणि तो होणारही नाही हे स्पष्ट झाल्याने या बंद दुकानांचे करायचे काय, या विवंचनेत मालक आहेत. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या व्यवसायात केली; पण सध्या ती विकलीही जात नाही आणि हस्तांतर करायचे म्हटल्यास प्रचंड अडथळे अशी विचित्र कोंडी या व्यापाऱ्यांची झाली आहे. 

दुकान स्‍थलांतरासाठी मालकांची पळापळ; रस्‍ते हस्तांतरात प्रचंड अडथळे

कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेली दारू दुकाने, परमिट रूम, वाइन शॉपसह कंट्री लिकरची दुकाने बंद झाली. यावर अजूनही निर्णय झालेला नाही आणि तो होणारही नाही हे स्पष्ट झाल्याने या बंद दुकानांचे करायचे काय, या विवंचनेत मालक आहेत. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या व्यवसायात केली; पण सध्या ती विकलीही जात नाही आणि हस्तांतर करायचे म्हटल्यास प्रचंड अडथळे अशी विचित्र कोंडी या व्यापाऱ्यांची झाली आहे. 

राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर दारू विक्रीस सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. १ एप्रिलपासून देशभर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. या निर्णयाने शिरोळपासून सांगली फाटा ते तावडे हॉटेल व तेथून आंबा घाटापर्यंतची दारूची दुकाने, परमिट रूम, बीअर बार, वाइन शॉपसह देशी दारूचीही दुकाने बंद करण्यात आली. शहरातील मार्गाची अधिसूचना बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे; पण त्यावर निर्णय कधी होणार हे माहीत नाही. या निर्णयाने पंचतारांकित हॉटेलसह शहरातील बंहुताशी बार व परमिट रूम बंद आहेत. या बंद झालेल्या व्यवसायात संबंधितांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. काही मोठी हॉटेल स्थलांतरित करायची म्हटले तरी ते शक्‍य नाही, त्यामुळे ही हॉटेल्स बंद ठेवण्याशिवाय मालकांपुढे पर्याय राहिलेला नाही. दुकाने किंवा बार स्थलांतरित करायचे म्हटल्यास त्याला सहजासहजी परवानगी मिळत नाही. राज्य उत्पादन शुल्क व जिल्हा प्रशासनाकडून यासाठी फारसा त्रास नाही; पण ज्या नव्या भागात दुकान चालू करायचे त्या भागातील नागरिकांचा आता विरोध वाढू लागला आहे. हा विरोध डावलून धैर्यप्रसाद मंगल कार्यालय परिसरात सुरू झालेले एक दुकान वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने इतर दुकानांना परवानगी देताना त्या परिसरातील लोकांचा ना-हरकत दाखल्याची गरज आवश्‍यक करण्यात आली आहे. 

सध्या असलेल्या जागेच्या आजूबाजूला जागा घ्यावी म्हटले, तर त्या परिसरातील जागेचे दर दुप्पट झाले आहेत. दुसरीकडे या व्यवसायातील 
स्पर्धाही वाढली आहे. बारच्या तुलनेत दुकानात मद्य स्वस्त मिळत असल्याने त्याचाही परिणाम व्यवसायावर होण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत दुसरीकडे मोठी गुंतवणूक करण्याची मानसिकता मालकांची नाही. सध्याच्या जागेवर दुकाने सुरू होण्याची शक्‍यता नाही आणि दुसरीकडे जाऊ शकत नाही, परिणामी या व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीने संबंधितांची झोप उडाली 
आहे.

जेवण चालू; पण...
बंद परमीट रूम, बीअर बारसोबत अनेक हॉटेल्समध्ये जेवणाचीही सोय आहे; पण बारच बंद झाल्याने जेवणासाठीही ग्राहकांची प्रतीक्षा करण्याची वेळ बारमालकांवर आली आहे. या निर्णयाने रोजगाराचाही मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बार बंद झाल्याने अतिरिक्त कर्मचारी कमी करण्याचा सपाटा मालकांनी लावला आहे. नोकरी गेलेले तरुण इतर व्यवसायाच्या शोधात फिरताना दिसत आहेत.

दृष्टिक्षेपात बंद दुकाने
शहरात २१० दारू विक्री केंद्रांपैकी (सर्व प्रकारची मिळून) १६१, तर जिल्ह्यातील १३५५ पैकी १०२६ दुकाने बंद आहेत. जिल्ह्यात केवळ ३२९ दुकाने चालू आहेत. आतापर्यंत चार दुकानांचे हस्तांतर झाले आहे. आंबेवाडीजवळील एक दुकान वडणगे रस्त्यावर महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर सुरू झाले आहे.

Web Title: Do you want a closed bar, a permit room?