कोल्हापूर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा उच्छाद; सुमारे ८३ जणांना चावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने आज उच्छाद मांडला. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर, स्टेशन रोड, उत्तरेश्‍वर पेठ, फुलेवाडी अशा ठिकाणी या कुत्र्याने सुमारे ८३ जणांना चावा घेतला. यातील ३० जणांना सीपीआरमध्ये, तर इतरांना खासगी रुग्णालयात दाखल केले. कुत्र्याचा शोध घेताना महापालिकेच्या यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली.

कोल्हापूर - शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने आज उच्छाद मांडला. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर, स्टेशन रोड, उत्तरेश्‍वर पेठ, फुलेवाडी अशा ठिकाणी या कुत्र्याने सुमारे ८३ जणांना चावा घेतला. यातील ३० जणांना सीपीआरमध्ये, तर इतरांना खासगी रुग्णालयात दाखल केले. कुत्र्याचा शोध घेताना महापालिकेच्या यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्या कुत्र्याला पकडण्यात यंत्रणेला यश आले नव्हते. एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर दाखल होणाऱ्या जखमींवर सीपीआरमध्ये तातडीने उपचार केले जात होते. 

याबाबत जखमींकडून मिळालेली माहिती अशी, शहरात भटक्‍या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कुत्र्याने चावा घेण्याच्या प्रकारातही तितक्‍याच पटीने वाढ होत आहे. शहरासह उपनगरात कुत्र्यांचे कळपच्या कळप तयार झाले आहेत. 

कोंडाळ्यात वावरणारी ही भटकी कुत्री रात्रीच्या वेळी तर पादचाऱ्यांसह वाहनचालकांचा पाठलाग करणे, हे आता नवीन राहिलेले नाही. त्यात आज भर पडली ती पिसाळलेल्या कुत्र्याची. सकाळी साडेअकराच्या सुमारास एक काळ्या रंगाचे कुत्रे पिसाळले. त्याने रस्त्यावरील पादचाऱ्यांसह वाहनचालकांचा चावा घेण्यास सुरवात केली. सकाळी दूध व्यावसायिक संदीप हेरवाडे हे शाहूपुरी कामानिमित्त गेले होते.

मोपेडवर बसून ते एकाशी बोलत होते. त्याचवेळी पिसाळलेले कुत्रे शांतपणे त्यांच्याजवळ आले. त्याने त्यांना चावा घेतल्यावर त्याला त्यांनी हटकले. ते रस्त्याने पुढे पळून गेले. जाताना त्याने आणखी एकाच्या पायाचा चावा घेतला. त्यानंतर हे कुत्रे शाहूपुरी पाचव्या गल्लीतून रस्त्यावरील पादचाऱ्यासह मोटारसायकलस्वारांना चावा घेत व्हिनस कॉर्नर येथे पोचले. त्यानंतर बसंत-बहार रोड, स्टेशनरोड येथे नागरिकांना चावा घेत सायंकाळी शुक्रवार पेठेत गेले. तेथेही त्याने महिला व लहान मुलांचा चावा घेतला. 

पिसाळलेल्या कुत्र्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी सायंकाळी पसरली. तशी महापालिका यंत्रणा खडबडून जागी झाली. कुत्रे कोणत्या दिशेला गेले. त्यानुसार त्याचा शोध यंत्रणेने सुरू केला, मात्र सायंकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे रस्त्यावरही तुरळक गर्दी होती. त्यामुळे कुत्र्याबाबत त्यांना माहिती मिळू शकली नाही. रात्री साडेआठच्या सुमारास हे कुत्रे फुलेवाडी परिसरात गेले.

तेथेही रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांचा त्याने चावा घेतल्यामुळे जखमी रात्री उशिरापर्यंत सीपीआरमध्ये दाखल होत होते. दिवसभरात या कुत्र्याने सुमारे ८३ जणांचा चावा घेतला. यातील ३० जणांना सीपीआरमध्ये दाखल केले होते. कुत्र्याच्या दहशतीमुळे शहरातील महिला वर्गांची सायंकाळनंतर गणेशोत्सवात असलेल्या लहान मुलांना घरी घेऊन जाण्याची धडपड सुरू होती. 

सीपीआरमध्ये दाखल जखमींची नावे - संभाजी विष्णू पाटील (वय ३५, पाचगाव, करवीर), बाबूराव इंगवले (६२, रा. शिये, करवीर), कुणाल अनंत हर्षे (२०, गोकुळ शिरगाव), शिवाजी रामचंद्र जाधव (४०, रा. कसबा बावडा), दीपक शिवाजी शिंदे (३४, रा. ताराबाई पार्क), सिद्धेश मधुकर पुरेकर ( १८, रा. शाहूपुरी सातवी गल्ली), रोहित रविकिरण पाटील (३४, रा. शाहूपुरी), प्रकाश जवकटी (२४, रा. इचलकरंजी), सरदार बजरंग सातपुते (३७, रा. सरवदे, पन्हाळा), पनव अतुल दोशी (२४, रा. ताराबाई पार्क), विशाल तानाजी डकरे (२४, रा. राधानगरी), राजाराम हरिबा मोहिते (७०, रा. बाजारभोगाव, पन्हाळा), भगवान शामराव सुमंत (६५), स्वप्नील प्रशांत देसाई (३०, रा. यादवनगर), प्रवीण घोडके (४२, रा. राजारामपुरी), मच्छिंद्र तुलसी सावंत (३५, रा. कोल्हापूर), संदीप विजय हेरवाडे (५५, रा. राजारामपुरी), स्वप्नील बाळासाहेब शिंगाडे (२२), सूरज जोतिराम आडसुळे (२४, रा. निगवे, ता. करवीर), ऐश्‍वर्या आनंदा कांबळे (२३, रा. पन्हाळा), आक्काताई बाळासाहेब अतिग्रे (४०, रा. ता. करवीर), नतुलाबाई महंमद नाईकवडी (६८), सुनंदा वसंत वरेकर (६६), पद्मजा पंडित धनवडे ( ५०), हुसेनबाई सोफीया मकानदार (५५), जयश्री मोहन फुले (५०), सरिता अनिल सुतार (३५), शोभा बाळासाहेब पाटील (७५), सोनिया झाड (रा. शुक्रवार पेठ), प्रशांत निशिकांत चौगुले  (३, रा. नेर्ली, करवीर), पियूश गणेश जोशी (४) अशी आहेत. 

महापालिका प्रशासनाबाबत नागरिकांची नाराजी...
भटक्‍या कुत्र्याबाबत उपाययोजना करण्यात महापालिका यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारच्या सक्षम उपाययोजना केल्या जात नाहीत. केवळ कागदोपत्री उपयायोजना दाखवल्या जातात. त्यामुळेच भटक्‍या कुत्र्याबरोबर आता पिसाळलेल्या कुत्र्यांचाही त्रास ऐन गणेशोत्सवात आम्हाला सहन करावा लागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया जखमींच्या नातेवाइकांकडून सीपीआरमध्ये व्यक्त होत होत्या. 

कुत्रे चावलेल्या जखमींवर सीपीआरमध्ये तातडीने उपचार करण्यात आले. यात १८ पुरुष १० महिला, तर २ लहान मुलांचा समावेश आहे. गंभीर जखमींना सीपीआरमध्ये दाखल करून घेण्यात आले. 
 - डॉ. आनंद आत्राम,
वैद्यकीय अधिकारी, सीपीआर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dog bites to 83 peoples in Kolhapur City