बंदी असूनही कुत्र्यांच्या शर्यतीची तरुणांत क्रेझ

भगवान शेवडे
Wednesday, 16 December 2020

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आठ महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील कॉलेज कुमार व अन्य तरुणांनी कुत्र्यांच्या शर्यतीचा वेगळा फंडा सुरू केला आहे.

मांगले : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आठ महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील कॉलेज कुमार व अन्य तरुणांनी कुत्र्यांच्या शर्यतीचा वेगळा फंडा सुरू केला आहे. कुत्र्यांच्या शर्यतीची तरुणांत वेगळीच क्रेझ तयार झाली आहे. आत्तापर्यंत वस्तीवरील राखणीसाठी कुत्री पाळणारे शेतकरी पाहत होतो. कालांतराने बदल होत गेले बंगल्यात घरात राखणीसाठी वेगळ्या जातीची कुत्री लोक पाळू लागलेत. हौशी लोकांकडे शिकारी कुत्र्यांची फौज आजही आहे. काही लोक आवड म्हणूनही कुत्रे पाळू लागले. 

वर्षभरात पाळीव कुत्र्यांऐवजी शर्यतीसाठी कुत्री पाळण्याची तरुणांत स्पर्धा लागली आहे. कॉलेजच्या तरूणांनी जास्त रस घेतल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामीण भागात यात्रेत कुस्त्यांचे फड, बैलगाडी शर्यती होतात. तशा आता कुत्र्यांच्या स्पर्धा सुरू झाल्या आहेत. कार्यकर्ते स्वतःच्या व नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा वर्गणी काढून स्पर्धा भरवत आहेत. 

कुत्र्याला मोटरसायकलवर घेऊन अनेक तरुण शर्यतीसाठी जाताना दिसतात. बक्षिसे आकर्षक रक्कमेची असल्यामुळे शर्यत कितीही दूरच्या गावी असली तरी कुत्र्याला घेऊन तरुण धावतात. शर्यतीसाठी साधारण शंभर मीटरचा ट्रॅक तयार करून एका लहान विद्युत पंपाच्या साह्याने दोरीला बांधलेला सशाच्या आकाराचे कापड घेऊन विशिष्ट वेगाने कुत्रा पळवला जातो. एकावेळी तीन-चार कुत्र्यांना ट्रॅकवरून पळवले जाते. काही ठिकाणी वेळ लावून शर्यत घेतली जाते. शर्यतीसाठी घेतलेल्या या महागड्या कुत्र्यासाठी आहाराची देखभाल तितकीच जोखमीने तरुण करतात. घरातील लोकांना शिजवलेले अन्न, तसेच ठराविक दुकानात मिळणारा कुत्र्यांसाठीचा आहार दिला जातो. 

कुत्र्यांसाठी बोलीही :
शर्यतीच्या ठिकाणी बैलगाडी शर्यती प्रमाणेच चांगल्या पळणाऱ्या बैलांच्या किंमतीती बोली लावली जाते. त्याच पद्धतीने कुत्र्यांच्या शर्यतीतही चांगल्या पळणाऱ्या कुत्र्यांना लाखात पैसे देऊन शौकीन खरेदी करीत आहेत. उंचीला जास्त असणारी आणि तोंड लांब असणारी सुसाट वेगाने धावणारी कुत्री दिसत आहेत. विशेष म्हणजे कुत्र्यांच्या किंमती वीस, पंचवीस, पन्नास हजारापासून लाखापर्यंत आहेत. ग्रामीण भागात शर्यतीवर बंदी आहे. मात्र कॉलेज तरुणांनी शाळा बंद असल्याचा फायदा उठवत कुत्र्यांच्या शर्यतीचा नवा फंडा राबवालयला सुरवात केली आहे.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dog racing craze among youth despite ban

Tags
टॉपिकस
Topic Tags: