आली गटारी, गावरान कोंबड्याचे भाव भारी (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

कोल्हापूर - श्रावणापूर्वी मांसाहारावर ताव मारण्यासाठी आणि आकाडी जत्रांसाठी मटण मार्केट परिसरातील कोंबडी बाजारात ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली. कोंबड्यांचे अव्वाच्या सव्वा दर सांगण्यात येत होते. गावठी कोंबडा १२००, तर कोंबडी ५०० रुपयेला, गावठी कोंबडा व कोबडी ही जोडी घ्यायची झाल्यास बाराशे रुपये असा दर सांगण्यात येत होता.

कोल्हापूर - श्रावणापूर्वी मांसाहारावर ताव मारण्यासाठी आणि आकाडी जत्रांसाठी मटण मार्केट परिसरातील कोंबडी बाजारात ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली. आता गटारी साजरी करायची असेल तर खिसा खाली करावा लागणार आहे. कारण कोंबड्यांचे अव्वाच्या सव्वा दर सांगण्यात येत आहेत. गावठी कोंबडा १२००, तर कोंबडी ५०० रुपयेला, गावठी कोंबडा व कोबडी ही जोडी घ्यायची झाल्यास बाराशे रुपये असा दर सांगण्यात येत होता. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी ग्राहकांनी दर थोडे कमी करून का होईना, कोंबड्यांची खरेदी मात्र केली.

तांबडा-पांढरा रश्‍श्‍यावर ताव मारणाऱ्यांना तसा कोणताच महिना मांसाहारासाठी वर्ज्य नसतो. मात्र, श्रावण महिना सुरू होणार म्हटल्यावर काही जण ‘अलर्ट’ होतात. श्रावणात मांसाहार केला जात नसल्याने मांसाहारावर आषाढाच्या शेवटच्या दोन आठवड्यांत चांगलाच ताव मारला जातो. त्यासाठी मटण, चिकन यांची खरेदी तर केली जातेच; शिवाय गावठी कोंबड्यांना अधिक मागणी असते. महे, बांबवडे, मलकापूर, फुलेवाडी, इचलकरंजी, वडणगे, कुशिरे, पोहाळे, प्रयाग चिखली, निगवे दुमाला, आंबेवाडी, गिरगाव, पाचगाव परिसरातील कोंबडी विक्रेते सकाळी आठ वाजताच कोंबडी बाजारात ठाण मांडून होते. गावठी, देशी क्रॉस, कडकनाथ, बॉयलर, लेगाऊन अशा विविध जातींच्या कोंबड्या बाजारात होत्या.

गावठी कोंबड्याचा दर ५००, ४५०, ७०० ते बाराशे रुपयांपर्यंत सांगितला जात होता. काही विक्रेत्यांकडून गावठी कोंबड्यांचा दर १२०० रुपये सांगण्यात येत होता. कोंबडी ३०० ते ५०० रुपयांपर्यंत विकली जात होती. तलंगचा दर दोनशे ते तीनशे रुपये होता. बॉयलरचा २०० ते दोनशे व लेगाऊनचा ५०० रुपये दर होता. विशेष म्हणजे गावठी कोंबडीचे एक अंडे सात रुपयांना विकले जात होते.

काळ्या रंगाच्या कडकनाथ जातीच्या कोंबड्याही बाजारात पाचशे रुपये दराने विक्रीस होत्या. प्रत्येक विक्रेता वेगवेगळे भाव सांगत असल्याने ग्राहकांच्या कपाळावर आठ्या पडत होत्या. विक्रेत्यांकडून सांगितलेल्या भावापेक्षा शंभर ते दोनशे रुपये कमी करून ग्राहक कोंबड्या खरेदी करत होते. बाजारात काही विक्रेते स्वतः पाळलेल्या कोंबड्या घेऊन आले होते, तर काही बाजारातच कोंबड्या खरेदी करून त्यांची विक्री  करत होते.

कोंबडी विक्रीचा व्यवसाय पाच वर्षे करत आहे. आषाढातील रविवारी ४० ते ५० कोंबडी विक्रीसाठी आणतो. त्यातील पस्तीस कोंबड्यांची विक्री होते. आषाढातील रविवारीच चांगली विक्री होते. अन्य रविवारी ग्राहक जे दर सांगतील त्याप्रमाणे कोंबड्यांची विक्री करावी लागते.
-रेखा हेळवी,
इचलकरंजी.
 
शाळू, गहू, तांदूळ, मका हे खाद्य कोंबड्यांना घालावे लागते. आठ ते नऊ महिन्यांत कोंबडा सुमारे दोन किलोचा होता. त्याच्या खाद्यावर होणारा खर्च, वाहतुकीचा खर्च व होणारी विक्री लक्षात घेतल्यास प्रत्येक कोंबड्यामागे शंभर ते दीडशे रुपये मिळतात.
- राजू हेळवी,
विक्रेता.

दर असे -

  •  कडकनाथ...............५००
  •  गावठी कोंबडा.........१२०० 
  •  कोंबडी....................५०० 
  •  तलंग.....................३००
  •  बॉयलर..................२०० 
  •  लेगाऊन................५००

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Domestic cock 1200, Kadaknath 500 Rs rate