सांगलीत दुहेरी खून; आरोपी फरार

murder
murder
  • मृत दोघेही भाजपचे कार्यकर्ते
  • शहरात जंगलराज
  • सावर्डेकर आखाड्याजवळील प्रकार
  • एक गंभीर जखमी

सांगली : पूर्ववैमनस्य आणि वर्चस्वातून येथील कोल्हापूर रस्त्यावरील रामनगरमध्ये धनवान ऊर्फ विकी राजेंद्र टिंगरे (वय 22, पहिली गल्ली, रामनगर), राहुल मल्लेश बंड्याघोळ (वय 25, सहावी गल्ली, रामनगर) या दोघांचा सुऱ्याने भोसकून निर्घृण खून झाला. हल्ल्यात हरीष सुखदेव शिंदे (वय 25, दुसरी गल्ली, रामनगर) गंभीर जखमी झाला आहे. संशयित हल्लेखोर अली मकाशी (तिसरी गल्ली, मशिदसमोर, रामनगर) दुचाकी घटनास्थळीच टाकून पळून गेला आहे.

कोल्हापूर रस्त्यावरील भारतभीम ज्योतिरामदादा पाटील-सावर्डेकर आखाड्यासमोर रात्री साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. कालच वाळवे तालुक्‍यात रेठरे येथे खून झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी डबल मर्डर झाला आहे. यानिमित्ताने रामनगर, शंभर फुटी परिसरातील जंगलराजचे भेसूर रुप पुन्हा एकदा समोर आले आहे. 


घटनेनंतर काही मिनिटांतच शहर पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन परिसरात बंदोबस्त वाढवला. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, उपाधीक्षक डॉ. दिपाली काळे, निरीक्षक अनिल गुजर, गुंडाविरोधी पथकाचे निरीक्षक विश्‍वनाथ घनवट यांनी घटनास्थळी भेट दिली. तेथे रस्त्यावर तीन चार ठिकाणी रक्ताचे थारोळे पडले होते.. हल्ल्यात वापरलेला सुरा, चपला आणि दुचाकीही पडली होती. मृत-जखमींना रात्री उशिरा सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे विविध राजकीय पक्षांचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. 
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, धनवान ऊर्फ विकी टिंगरे याच्या वडिलांचे जेसीबी मशीन आहे. राहुल हा फॅब्रिकेशनचे काम करतो. हरीष वायरमन आहे. तिघेजण मित्र आहेत. तिघेही भाजपचे कार्यकर्ते म्हणून त्या भागात कार्यरत होते. रामनगरमध्ये सहाव्या गल्लीत सासूरवाडीत राहायला आलेला अली मकाशी (मूळ रा. विजापूर) प्लॉट एजंट आहे. अली आणि विकी, राहुल यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यावेळी त्यावर पडदा पडला होता. त्यानंतर दोघांमध्ये एकमेकांना जाहीरपणे खुन्नस दिली जात होती. अली गल्लीतून वेगाने दुचाकी पळवत असल्याने त्यांच्यातील वादात भर पडली. 


दरम्यान विकी, राहुल, हरिष यांनी काही दिवसापूर्वी "जीम' मध्ये व्यायाम सुरू केला होता. सायंकाळी व्यायामाला जाण्यासाठी ते रामनगरला पहिल्या गल्लीत कोपऱ्यावर थांबले होते. त्याचवेळी अली याने तेथून जाताना एका मुलास मारहाण केली. तिघांनी अलीला अडवून का मारलेस म्हणून जाब विचारला. तेव्हा अलीने सुरा काढून विकी व राहुलच्या पोटावर, मानेवर सपासप वार केले. अंधारात अचानक झालेल्या हल्ल्यामुळे विकी, राहुलला बचावाची संधीच मिळाली नाही. हरिषच्या छातीवर देखील अलीने वार केला. विकी, राहुल गंभीर जखमी होऊन रस्त्यावरच कोसळल्यानंतर अली यामाहा दुचाकी (एमएएल-3101) तेथेच टाकून पलायन केले. बाजुलाच सुराही फेकला. 

आरडाओरडीनंतर नागरिक घटनास्थळी धावले. जखमी विकी, राहुल, हरिषला जवळच्या खासगी रूग्णालयात नेले. तेथून तत्काळ सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलवले. विकी, राहुल यांना अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू केले. परंतू उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. तर हरिषवर तातडीने उपचार करण्यात आले. पंचनाम्यादरम्यान दोघांची चप्पल, हल्ल्यात वापरलेला सुरा आणि दुचाकी जप्त करण्यात आले. रक्त नमुने गोळा करण्यात आले. आमदार सुधीर गाडगीळ, पोलिस अधीक्षक शिंदे यांनी जखमीची भेट घेतली. 

वचपा काढण्याचे इशारे 
हल्लेखोर अली दुचाकी टाकून रामनगरमध्ये पहिल्या गल्लीत अंधारात पळाल्याचे अनेकांनी पाहिले. त्यानंतर पोलिसांनी अलीची रात्रीच शोधमोहिम राबवली.ठिकठिकाणी रामनगरात छापे टाकले. अली एका धार्मिक पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समजते. मात्र त्याला दुजोरा मिळाला नाही. मृत टिंगरे व बंड्याघोळ भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे शहरातील भाजप व अन्य पक्षांचे कार्यकर्त्यांनी सिव्हिलचे आवार व्यापले. प्रकार समजताच संतप्त कार्यकर्ते वचपा काढण्याचे इशारे देत होते. त्यानंतर पंधरा-वीस जणांनी दुचाकी घेऊन घटनास्थळी आल्याने रामनगरात तणाव निर्माण झाला. 

खूनसत्र कायम 
काल रात्री फरारी गुंड भावशा पाटीलने संताजी खंडागळे यांचा खून करून पत्नी व शेजाऱ्यास भोसकले. आज सांगलीत अली मकाशी याने पूर्ववैमनस्यातून एकाचवेळी तिघांना भोसकले. त्यात दोघांचा मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी खुनाचा प्रकार घडल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. पाच वर्षापुर्वी गुंड व नगरसेवक दाद्या सावंत याचाही दोन डिसेंबरलाच खून झाला होता. शहरातील गुंडगिरीव व दहशतीचे चित्र कायम असल्याचे दर्शवणारे हे खूनसत्र आहे. 
 

आरोपींच्या अटकेसाठी संयुक्त पोलिस पथक

'डबल मर्डर' झाल्यानंतर अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नंतर सिव्हील हॉस्पिटलमध्ये जखमी हरिष शिंदेकडून माहिती घेतली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""दोन गटातील तत्कालीन वादातून दोघांचा खून झाला आहे. तिघा-चौघांनी हल्ला केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले. संशयिताची नावे मिळाली आहेत. त्यांना पकडण्यासाठी विविध पोलिस ठाण्यांचे संयुक्त पथक तयार केले आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी छापे मारले आहेत.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com