खरीपातील आवर्तन वेळेत न केल्याने दुष्काळाची तीव्रता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातील नैसर्गिक प्रवाह खुले केले पाहिजेत. पूर्वीप्रमाणे ओढे, नाले, नद्यांची खोली केली, तर पुराचे प्रमाण कमी होईल. २००५ नंतर उपाययोजना करायला हवी होती. त्याचा आरखडा करायला पाहिजे होता. पूररेषेच्या बाहेर लोकांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्याचा खर्च शासनाने करायला पाहिजे.

- डॉ भारत पाटणकर

झरे - सातारा, कोल्हापूर, सांगली येथे जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर नदीत पाणी वाढू लागले. तेव्हा खरीपाचे आवर्तन सुरु करायला हवे होते. तसे केले असते, तर दुष्काळी भागाला दिलासा मिळाला असता. शासनाकडून चारा व पाण्यावर होणारे करोडो रुपयाचे नुकसान टाळता आले असते. आमच्या हक्काचे पाणी आहे. ते आम्हाला आवर्तनाच्या रूपाने मिळालेच पाहिजे, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी केले.

श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने वंचित गावच्या कार्यकर्त्याची बैठक झाली. यावेळी डॉ. पाटणकर मार्गदर्शन करीत होते. पाटणकर म्हणाले, खरीप हंगामातील आवर्तन जून - जुलैमध्ये सुरु केले असते, तर दुष्काळी भागातील खरीप हंगाम पार पडला असता. खरीप हंगामातील पिके वाया गेली नसती. जित्राबांना चारा उपलब्ध झाला असता, पिण्याचे पाणी उपलब्ध झाले असते. छावणीवर होणारा खर्च वाचला असता. पिण्याच्या पाण्याचा टॅंकरचा खर्च वाचला असता. पण शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे छावणीवर व पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरवर करोडो रुपये खर्च झाला आहे. 

सध्या ४८ गावासाठी पाईपलाईनचे काम संतगतीने सुरु आहे. ते काम वेगाने सुरु व्हायला पाहिजे. लवकरात लवकर पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेले पाहिजे. वंचित बारा गावचा टेंभू योजनेत समावेश नव्हता. त्या बारा गावचा टेंभू योजनेत समावेश झाला आहे. त्या गावचा सर्व्हे झाला आहे. आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. लवकरच त्यानुसार शासनाकडे पैशाची मागणी करणार आहे, असे श्री. पाटणकर म्हणाले.

कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातील नैसर्गिक प्रवाह खुले केले पाहिजेत. पूर्वीप्रमाणे ओढे, नाले, नद्यांची खोली केली, तर पुराचे प्रमाण कमी होईल. २००५ नंतर उपाययोजना करायला हवी होती. त्याचा आरखडा करायला पाहिजे होता. पूररेषेच्या बाहेर लोकांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्याचा खर्च शासनाने करायला पाहिजे.

- डॉ भारत पाटणकर

श्रमिक मुक्ती दलाचे आनंदराव पाटील, एकनाथ पावणे, प्रवीण पावणे, उपसरपंच सिद्धू थोरात, माजी उपसरपंच तुकाराम पावणे, नामदेव मोटे, भीमराव खडसरे आदी आटपाडी, सांगोला  तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.    

दुष्काळी भागाच्या हक्काचे पाणी जून जुलैमध्ये आवर्तन केले असते. तर दुष्काळी भागातील चारा - पाण्यासाठी होणारा कोठ्यावाधीचा शासनाचा खर्च वाचला असता. नदीकाठी पावसाळा सुरु होताच खरीप आवर्तनाचे पाणी सोडायला पाहिजे होते. 

- डॉ. भारत पाटणकर 

वंचित 12 गावाचा समावेश झाला आहे. आत्ता पैशाची मागणी करणार आहोत. त्यामुळे टेंभूचे नाव घेऊन राजकीय मंडळींनी वंचित गावातील भोळ्याभाबड्या जनतेची फसवणूक करू नये. केवळ मतासाठी जनतेला थापा मरू नयेत

- आनंदराव पाटील, नेते, श्रमिक मुक्ती दल   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Bharat Patankar comment