मुलींनो, सक्षम व्हा, कणखर बना - डॉ. दीपाली काळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

सांगली - माया, ममता अन्‌ वात्सल्य हे महिलेचं रूप आहे. आताच्या युगात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. तो थोपवण्यासाठी मुलींनीच संघटित होऊन स्वयंसिद्ध बनले पाहिजे. तरच अत्याचारावर पायबंद बसेल, असे प्रतिपादन पोलिस उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी आज येथे केले. 

सांगली - माया, ममता अन्‌ वात्सल्य हे महिलेचं रूप आहे. आताच्या युगात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. तो थोपवण्यासाठी मुलींनीच संघटित होऊन स्वयंसिद्ध बनले पाहिजे. तरच अत्याचारावर पायबंद बसेल, असे प्रतिपादन पोलिस उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी आज येथे केले. 

सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) सांगलीवाडीतील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात संवाद कार्यक्रम झाला. ‘मुलींची सुरक्षितता’ याविषयी डॉ. काळे यांनी मुक्त संवाद साधला. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा निरीक्षक डॉ. महेश काकडे यांची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे अध्यक्षस्थानी होते. डॉ. काळे म्हणाल्या, ‘‘समाजात महिलांचे स्थान उंचावत आहे. मात्र, खऱ्या अर्थाने सुरक्षित आहोत का? चौकटीतून कधी बाहेर पडलोत का? असे प्रश्‍न कायम आहेत. अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, ते थांबवण्याची जबाबदारी आपलीच. टीव्हीवर अनैतिकतेला नैतिकता म्हणून दाखवले जाते. त्याचा काहीसा परिणाम आपल्यावर झाला. मानसिकता बदला. चौकटीबद्ध न राहता वैचारिकता वाढवा. अन्यायाला त्याचवेळी प्रत्युत्तर देता आले तरच समाजात टिकाव लागेल. ‘तुम नकाब में रहो...दुनिया औकात में रहेगी’ हे वाक्‍य वापरण्याची गरज भासणार नाही. स्वतः स्वयंसिद्ध बना. तुम्हीच तुमचे मार्गदर्शक बना.’’

श्री. जोशी यांनी ‘सकाळ’ च्या उपक्रमांची माहिती दिली. ‘यिन’ ची चळवळ स्थापन करण्यामागचा हेतूही स्पष्ट केला. महिलांना स्वयंसिद्ध बनण्यात ‘सकाळ’ ची साथ राहील, अशी ग्वाही दिली. डॉ. काकडे, डॉ. कणसे यांची भाषणे झाली. त्यांनी उपक्रमांची माहिती दिली. गुणवत्तेचा चढता आलेख मांडला. ‘यिन’ चे समन्वयक विवेक पवार, प्रशांत जाधव, पौर्णिमा उपळावीकर, अमृता चोपडे, सुकन्या जोशी, तेजस्विनी पाटील, निकीता शिंदे, सायली देशमुख, अनुराधा बुर्ले, सुरेखा पवार यांनी संयोजन केले. प्रा. भारती भावीकट्टी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शोभा पाटील यांनी आभार मानले.

‘यिन’ चळवळीचे कौतुक 
उपाधीक्षक डॉ. काळे यांनी ‘सकाळ’ने विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या ‘यिन’ चळवळीचे कौतुक केले. ‘यिन’च्या माध्यमातून विधायक कामे होताहेत. तरुणाईने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

Web Title: dr. deepali kale speech