सार्वजनिक व्यवस्थेच्या खासगीकरणाचा डाव - गणेश देवी

सार्वजनिक व्यवस्थेच्या खासगीकरणाचा डाव - गणेश देवी

इस्लामपूर - सामान्य आणि मध्यमवर्गीय माणसं सरकारला बोजा वाटत आहेत. यामुळेच सार्वजनिक व्यवस्थेला खासगीकरणाचे रूप दिले जात आहे. सरकारचे बदललेले स्वरूप ठिकाणावर आणण्यासाठी संविधानाच्या व सत्याच्या मार्गाने एकत्रित येऊन लढा उभारायला हवा, अशी अपेक्षा पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी येथे व्यक्त केली. येथे झालेल्या एसटी बचाव परिषदेत ते बोलत होते.

एसटीचा लढा कोणत्या कामगारांचा नाही, प्रवाशांचा नाही तर तो जगातील सर्वसामान्यांचा स्वातंत्र्याचा लढा आहे. या प्रश्‍नावर राज्यातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन त्यांनी केले. 

परिषदेतील ठराव

  • शैक्षणिक सवलतीचे पास मोफत द्यावेत,
  • गाव तिथे एसटी सुरू करावी,
  • नवीन बस तातडीने व पारदर्शकपणे खरेदी कराव्यात, ‘एसटी’तील रिक्त पदे भरावीत,
  • सवलतींचे शासनाकडून येणे असणारे देणे ‘एसटी’ला देण्यात यावे,
  • ‘एसटी’ला टोल पूर्णपणे माफ करावा,
  • इंधन व इतर खरेदीवरील जीएसटी माफ करावी,
  • प्रवासी कर माफ करावा,


माजी प्राचार्य विश्‍वास सायनाकर अध्यक्षस्थानी होते. या वेळी राज्य एसटी कामगार संघटनेचे हनुमंत ताटे, जिल्हा परिषदेचे सभापती प्रा. सुषमा नायकवडी यांच्यासह तालुक्‍यातील महाविद्यालयाच्या प्राचार्यांची प्रमुख उपस्थिती होती. गणेश देवी म्हणाले, की देशात भांडवलदारांना प्रोत्साहन देणाऱ्या अनेक घटना आहेत. सर्वच क्षेत्रांत खासगीकरण करून सर्वसामान्यांना जमीनदोस्त करायचे आहे. एसटी कामगार संघटनेचे हनुमंत ताटे म्हणाले, की केंद्र सरकारने नवा मोटार वाहन कायदा लोकसभेत मंजूर केला आहे. त्याला राज्यसभेत पाठिंबा मिळाल्यास एसटीचे अस्तित्व संपणार आहे. सध्या एसटीला जाणीवपूर्वक आजारी पाडण्याचे काम सुरू आहे. सकारात्मक यशासाठी संघटित होऊया. क्रांतिकारी तालुक्‍यातून उभा राहिलेला हा लढा जनआंदोलन उभा करेल. या वेळी प्राचार्य सायनकर, प्रा. नायकवडी, डॉ. राजेंद्र कुरळपकर, धनाजी गुरव यांचीही भाषणे झाली. प्राचार्य एच. टी. दिंडे यांनी आभार मानले. बी. जी. पाटील, प्राचार्य अरुण जाधव, डॉ. एस. आर. माने, डॉ. मिलिंद देसाई, डॉ. विलास काळे, ॲड. के. डी. शिंदे उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com