डॉ. ऋत्विक वाघमारेंना "नासा'ची फेलोशिप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

मायणीसारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेऊनही त्यांनी मिळविलेले हे यश निश्‍चितच अभिमानास्पद व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण करणारे, प्रेरणादायी असेच आहे. 

मायणी : येथील डॉ. ऋत्विक रस्तुम वाघमारे यांना जीवसृष्टीय उत्क्रांतीवर संशोधन करण्यासाठी नासा (नॅशनल एरॉनॉटिक्‍स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन) द्वारे फेलोशिप मिळाली आहे. त्यामुळे डॉ. वाघमारे यांच्यासह पेशाने शिक्षक असलेल्या आई-वडिलांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जरुर वाचा -  दहावीचे विद्यार्थी, पालकहाे तुमच्यासाठी...

डॉ. वाघमारे यांनी मोहाली (पंजाब) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) या नामांकित संस्थेच्या माध्यमातून ऍस्ट्रॉबायोलॉजी अंतर्गत डायनॅमिक ह्युमन इव्हॅल्युएशन (गतिशील मानवी उत्क्रांती) या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्या संशोधनासाठी डॉ. वाघमारे यांना मानक इन्स्पायर ऍवॉर्ड व डॉ. शांतीस्वरूप भटनागर प्राईज फॉर सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी हा पुरस्कारही देण्यात आला आहे. पुरस्कारासाठी झालेल्या निवडीबाबत "द ऑस्टेस्लियन' या आंतरराष्ट्रीय पत्रानेही दखल घेऊन डॉ. वाघमारेंचे कौतुक केले.
 
दरम्यान, डॉ. वाघमारे यांनी पुढील संशोधनासाठी फेलोशिप मिळण्याबाबत "नासा'कडे अर्ज केला. डॉ. वाघमारेंचे संशोधनातील काम लक्षात घेऊन "नासा'ने त्यांना फेलोशिप जाहीर केली. शालेय जीवनात त्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असतानाही त्यांनी आपले शिक्षण मायणीतच घेतले. पुढील शिक्षण मात्र घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथे झाले.

हेही वाचा - महाराष्ट्रच्या मुलींचा जिगरबाज खेळ ; केरळला नमविले 

मायणीसारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेऊनही त्यांनी मिळविलेले हे यश निश्‍चितच अभिमानास्पद व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण करणारे, प्रेरणादायी असेच आहे. डॉ. वाघमारे यांच्या अभूतपूर्व यशाबद्दल समाजोन्नती मंडळ वडजल, मायणी पत्रकार संघ, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह प्रा. डॉ. श्‍यामसुंदर मिरजकर, विजय किरतकुडवे, अशोक शेडगे, कवी व लेखक बाळासाहेब कांबळे, करुणा कांबळे यांनी डॉ. वाघमारे यांचे अभिनंदन केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Hrithik Waghmare Has Received A Fellowship From NASA