Loksabha 2019 : डॉ. जयसिद्धेश्वर महाराज म्हणतात, 'देव आपल्या सर्वातच आहे...'

विजयकुमार सोनवणे 
मंगळवार, 2 एप्रिल 2019

  • डॉ. जयसिद्धेश्वरांनी साधला ज्येष्ठ नागरीकांशी संवाद
  • म्हणाले, 'देव तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सर्वत्र आहे'
  • 23 मे ला होणाऱ्या जल्लोषाची तयारी करण्याचे आवाहन

लोकसभा 2019
सोलापूर : पहाटेचे साडेसहा वाजले... महापालिकेच्या आवारात ज्येष्ठांसह युवक-युवतीही दैनंदिन कवायती-योगा करण्यात मग्न... इतक्यात एक चारचाकी वाहन पहिल्यांदाच महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आले आणि त्यातून उतरले लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज. भगवे वस्त्र परिधान केलेल्या महाराजांना पाहून अनेकांनी त्यांना लोटांगण घातले, तर अनेकांनी त्यांच्यासमवेत सेल्फी काढला, फोटोसेशन केले. 'देव तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सर्वत्र आहे' असे सांगत काही  त्यांनी दिवसांपूर्वी त्या वक्तव्यावरून निर्माण झालेले वादळ शांत करण्याचा प्रयत्न केला.

महापालिकेच्या आवारातील ज्येष्ठ नागरीकांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्यासमवेत हास्याचा गडगडाटही केला. व्यायमाचे काही प्रकारही केले. त्यानंतर या परिसरातील महिलांशी संवाद साधला. या मुलाला आपल्या सेवेची संधी द्या, असे आवाहन केले. त्यानंतर महाराजांचा ताफा खंदक बागेकडे निघाला. प्रथम तुला वंदितो.. हे गीत एका ज्येष्ठ नागरिकाने बासरीवर वाजवून त्यांचे स्वागत केले. ते ऐकताना महाराजही काही क्षण तल्लीन झाले होते. त्यानंतर महाराजांनी या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.

खंदक बागेतील ज्येष्ठांना भेटल्यानंतर महाराजांनी हुतात्मा बागेतील ज्येष्ठांशी संवाद साधला. या ठिकाणी कन्नडमध्ये गीत गाऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. मी राष्ट्रासाठी निवडणुकीत उतरलो आहे. मी निवडून आल्यावर पाच वर्षे तुमचा बोजा माझ्यावर असणार आहे. त्यामुळे 23 मे ला होणाऱ्या जल्लोषाची तयारी करा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रताप चव्हाण, विजय पुकाळे व महेश धाराशिवकर उपस्थित होते. 

माझा वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. देव तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सर्वत्र आहे. सलग आलेल्या सुटीचा फायदाही घ्या मात्र त्याचवेळी
मतदानाचे पवित्र कर्तव्यही पार पाडा, असे मी म्हटले होते. मात्र आवश्यक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला, त्यामुळे अनेकांचा गैरसमज झाला.
- डॉ. जयसिद्धेश्वर महाराज, उमेदवार सोलापूर लोकसभा मतदार संघ

 

Web Title: Dr Jaisiddheshwar Maharaj says God is everywhere