डॉ. किरवलेंच्या हत्येमुळे चळवळीची हानी - गंगाधर पानतावणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

कोल्हापूर - आंबेडकरी विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येमुळे चळवळीची मोठी हानी झाली असून, त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी त्यांच्या नावाने कोल्हापुरात व्याख्यानमाला सुरू व्हावी, त्यांचे स्मारक व्हावे, अशा अपेक्षा आज शोकसभेत व्यक्त झाल्या. डॉ. कृष्णा किरवले यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी बिंदू चौकातही शोकसभा झाली. या वेळीही विविध मान्यवरांनी डॉ. किरवले यांना आदरांजली व्यक्त करताना या अपेक्षा व्यक्त केल्या. 

कोल्हापूर - आंबेडकरी विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येमुळे चळवळीची मोठी हानी झाली असून, त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी त्यांच्या नावाने कोल्हापुरात व्याख्यानमाला सुरू व्हावी, त्यांचे स्मारक व्हावे, अशा अपेक्षा आज शोकसभेत व्यक्त झाल्या. डॉ. कृष्णा किरवले यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी बिंदू चौकातही शोकसभा झाली. या वेळीही विविध मान्यवरांनी डॉ. किरवले यांना आदरांजली व्यक्त करताना या अपेक्षा व्यक्त केल्या. 

ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे म्हणाले, ‘‘डॉ. किरवले यांच्या हत्येचे वृत्त अत्यंत सुन्न करणारे आहे. प्रतिकूल स्थितीतून ते जिद्दीने शिक्षण घेत पुढे आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित त्यांनी विपुल लेखन केले. ते कट्टर आंबेडकरवादी होते. सतत नवोदितांना प्रेरणा देत असत. अलीकडच्या काळात सांस्कृतिक दहशतवाद फोफावला आहे. मूलतत्त्ववादी शक्ती वेगाने उभ्या राहत आहेत. त्यांना थोपविण्यासाठी संघटन व संघर्षाची गरज आहे. डॉ. किरवले यांनी आंबेडकरी विचार चळवळीविषयी लेखन केले. त्याआधारे आपली वैचारिक मशागत करणे अपेक्षित आहे. त्यासाठी डॉ. किरवले यांच्या नावाने याच शहरात व्याख्यानमाला सुरू व्हावी. त्यात आंबेडकरी विचार मांडले जावेत.’’

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘डॉ. किरवले यांच्या हत्येचे वृत्त वेदनादायी आहे. गेल्या काही वर्षांत विचार मांडावेत की न मांडावेत अशी स्थिती समाजात आहे. ॲड. पानसरे यांच्यानंतर डॉ. किरवले यांची हत्या झाली. या घटनेनंतर एका पोलिस अधिकाऱ्याने तत्काळ याबाबत वत्कव्य केले. यातून तपासला वेगळी दिशा दिली जातेय का, अशी शंका बळावते. त्यामुळे या हत्येमागील खरा सूत्रधार कोण, हेही शोधावे लागेल. त्यासाठी खास पथक स्थापन करून घटनेचा सखोल तपास व्हावा अशी अपेक्षा आहे.’’  

श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ‘‘देशात दिवसाढवळ्या विचारवंत माणसं मारली जात आहेत. चळवळी उभारणारे, लोकांना चांगले विचार सांगणाऱ्यांवर होणारे हल्ले विघातक आहेत. अशा स्थितीत आपापल्यांतील मतभेद विसरून एकत्र येत या विरोधात आवाज उठविला पाहिजे.’’ 

सामाजिक कार्यकर्ते व्यंकाप्पा भोसले म्हणाले, ‘‘समाजात विषमतावाढीस लावणाऱ्या शक्ती कार्यरत आहेत. लोकशाहीचा विचार जे मांडतात, त्यांना संपविण्याचा प्रयत्न होत आहे. अशा स्थितीत शत्रू कोण व मित्र कोण, यातील परक करण्याची वेळ आली आहे.  

पार्थ पोळके म्हणाले, ‘‘देशातील पुरोगामी विचार संपविण्यासाठी माणसे मारण्याचे सत्र सुरू आहे. ज्यांच्या डोक्‍यातून विचार बाहेर पडतात, अशांना मारले जात आहे, तरीही सरकार काही करत नाही. ॲड. पानसरे व डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे सूत्रधार अद्यापही सापडलेले नाहीत. त्यामुळे चळवळीपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ते थोपविण्यासाठी सर्वांनी ताकदीने उभे राहिले पाहिजे.’’

रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे प्रा. डॉ. विश्‍वास देशमुख म्हणाले ‘‘श्रमिकांना उभे करणारे विचार डॉ. किरवले मांडत होते. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करावा.’’   

पीपल्स रिपब्लिकनचे दगडू भास्कर म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात विचारवंतांवर होणारे हल्ले चिंतेची बाब आहे. डॉ. किरवले यांच्या हत्येचा तपास करण्यापूर्वी या घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केल्यास चळवळीतील कार्यकर्ते तीव्र आंदोलन करतील.’’  

ब्लॅक पॅन्थरचे सुभाष देसाई म्हणाले, ‘‘कोणताही तपास करण्यापूर्वीच पोलिसांनी या हत्येमागे व्यक्तिगत कारण असल्याचे सांगणे चुकीचे आहे. डॉ. किरवले यांची हत्या म्हणजे विचारांवरील आघात आहे. त्यामुळे या घटनेचा सखोल तपास व्हावा.’’ 

गौतमीपुत्र कांबळे, गणी आजरेकर, आपचे संदीप पाटील, डॉ. ऋषीकेश कांबळे, आरपीआय आठवले गटाचे उत्तम कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. आरपीआयचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष शहाजी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: DR. Kiravale loss of movement murder