पर्यटकांना मराठीतून मिळणार डॉ. कोटणीसांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

सोलापूर : मानवतेचे महामेरू डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची माहिती असलेल्या www.drkotnissmark.org या संकेतस्थळाचे रविवारी उद्‌घाटन झाले. या संकेतस्थळावर पर्यटकांना डॉ. कोटणीस यांची माहिती मराठीतून मिळणार आहे. 

सोलापूर : मानवतेचे महामेरू डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची माहिती असलेल्या www.drkotnissmark.org या संकेतस्थळाचे रविवारी उद्‌घाटन झाले. या संकेतस्थळावर पर्यटकांना डॉ. कोटणीस यांची माहिती मराठीतून मिळणार आहे. 

डॉ. कोटणीस स्मारक येथे महानगरपालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, ज्येष्ठ पत्रकार संजीव पिंपरकर यांच्या उपस्थितीत संकेतस्थळाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी महिला व बालकल्याण सभापती रामेश्‍वरी बिर्रु, स्थापत्य समिती सभापती गुरुशांत धुत्तरगावकर, नगरअभियंता संदीप कारंजे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी रमेश मोहिते, "इंटॅक'च्या सीमंतिनी चाफळकर, प्रीती श्रीराम, प्रा. गणेश चन्ना, इतिहास अभ्यासक नितीन आणवेकर, मुख्य सफाई अधीक्षक संजय जोगदनकर, प्रदीप जोशी, चपळगावकर, विजय कांबळे आदी उपस्थित होते. संकेतस्थळावर डॉ. कोटणीस यांची सर्व माहिती मराठी भाषेतून उपलब्ध करण्यात आली. लवकरच इंग्रजी भाषेतूनही माहिती अपडेट करण्यात येणार आहे. 

सामाजिक उपक्रमांसाठी कोटणीस स्मारक येथील खुले सभागृह मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी या वेळी सांगितले. शहरात येणाऱ्या प्रवाशांना स्मारकाची माहिती होण्याकरिता दिशादर्शक फलक लावण्याविषयी आयुक्तांनी सूचना दिल्या. 

मानवतेला कोणतीही सीमा नसते याची प्रचिती डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या कार्यातून येते. त्यांनी देशाची सीमा ओलांडून चीनमध्ये सेवा दिली. आपण सोलापूरकर भाग्यवान असलो तरी आपले हे वैभव इतरांपर्यंत पोचविण्यात आजवर आपण कमी पडलो आहोत. आता येथून पुढे सोलापूरच्या तरुणांनी हा वसा घ्यावा आणि सोशल मीडियाद्वारे ही माहिती इतरांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी या वेळी केले. 

डॉ. कोटणीस यांच्या सेवाव्रती जीवनप्रवासातून प्रेरणा मिळावी, यादृष्टीने महापालिकेच्या वतीने शहरातील सेवाभावी डॉक्‍टरांच्या सहकार्यातून रोज मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा मानस आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय सुरू करण्यात येईल. 
- डॉ. अविनाश ढाकणे, महापालिका आयुक्त

Web Title: DR Kotnis information available in marathi