डॉ. कृष्णा किरवले यांचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

कोल्हापूर - आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत व शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. कृष्णा किरवले यांचा आज खून झाला. राजेंद्रनगर येथील म्हाडा कॉलनीतील त्यांच्या घरातच सायंकाळी 5 च्या सुमारास हा हल्ला झाला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार फर्निचर कामाचे पैसे आणि त्यातून उद्‌भवलेला वाद यातून हा खून झाला असावा.

कोल्हापूर - आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत व शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. कृष्णा किरवले यांचा आज खून झाला. राजेंद्रनगर येथील म्हाडा कॉलनीतील त्यांच्या घरातच सायंकाळी 5 च्या सुमारास हा हल्ला झाला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार फर्निचर कामाचे पैसे आणि त्यातून उद्‌भवलेला वाद यातून हा खून झाला असावा.

पोलिसांनी प्रीतम गणपत पाटील याच्यावर संशयाची सुई रोखली आहे. रात्री 8 च्या सुमारास संशयिताच्या घराची जमावाने मोडतोड केली. डॉ. किरवले यांचा खून झाल्याचे समजताच आंबेडकरी व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी एकच गर्दी केली होती.

पोलिसांनी सांगितले, की डॉ. किरवले म्हाडा कॉलनीतील घरात बसले होते. त्याच परिसरात राहणारा प्रीतम पाटील फर्निचरच्या केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी आला. या वेळी दोघांमध्ये वाद झाला. रागाने बेभान झालेल्या संशयिताने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करण्यास सुरवात केली. त्याच वेळी त्यांची पत्नी आतून आली. त्यांना डॉ. किरवले रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांनी ओरडण्यास सुरवात केली. त्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले. या घटनेची माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्यात देण्यात आल्यानंतर तत्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, या हल्ल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. आंबेडकरी चळवळ व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी कृष्णा किरवले यांच्या म्हाडा कॉलनीतील निवासस्थानाकडे धाव घेतली. बघता बघता मोठी गर्दी जमली. दरम्यान, संतप्त जमावाने रात्री आठच्या दरम्यान संशयित हल्लेखोराच्या घरावर हल्ला केला. घरातील साहित्याची मोडतोड केली.
डॉ. किरवले यांचे शिक्षण औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजमध्ये झाले. तेथेच त्यांच्यावर आंबेडकरी चळवळीचे संस्कार झाले. त्यांनी अखेरपर्यंत लिखाणाच्या माध्यमातून आंबेडकरी विचारांचा जागर जागविला. जळगाव येथे 2012 मध्ये झालेल्या 31 व्या अस्मितादर्श साहित्य संमालनाचे ते अध्यक्ष होते. दलित चळवळ आणि साहित्य, समग्र लेखक बाबूराव बागुल अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे प्रमुखपदही त्यांनी काही काळ भूषविले होते. काही महिन्यांपूर्वीच ते विद्यापीठातून निवृत्त झाले होते.

मान्यवरांची श्रद्धांजली 
'आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता हरपला'
डॉ. कृष्णा किरवले यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ता आणि दलित विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ हरपला, अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी आज व्यक्त केली. 

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे 
डॉ. किरवले यांच्या निधनामुळे आंबेडकरी विचारांचा ज्येष्ठ संशोधक व ग्रामीण-दलित साहित्याचा थोर अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेला आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सच्चे अनुयायी आणि संशोधक होते. मराठी अधिविभागातील प्राध्यापक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक या भूमिकेतून त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास व संशोधन यांना चालना देण्याचे कार्य केले. दलित-ग्रामीण साहित्याचा शब्दकोश निर्माण करून त्यांनी मराठी साहित्याला मोठी देणगी दिली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 125 महाविद्यालयांत एकाच दिवशी एकाच वेळी 125 व्याख्याने आयोजित करण्याचा उपक्रम मी जाहीर केला. या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी आणि त्यानंतर या भाषणांचा संग्रह निर्माण करण्याच्या कामी डॉ. किरवले यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. 

प्रा. डॉ. रवींद्र ठाकूर 
डॉ. किरवले माझे जवळचे मित्र होते. दलित साहित्य हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. ते सर्वसामान्य कुटुंबातून आले असल्याने गरीब विद्यार्थ्यांविषयी त्यांना आपुलकी होती. आमचे नातेही जिव्हाळ्याचे होते. त्यांच्यावर झालेला हल्ला धक्कादायक आहे. अशा घटना महाराष्ट्रात घडणेच दुर्दैवी आहे. 

प्रा. डॉ. विश्‍वनाथ शिंदे 
डॉ. किरवले यांचा चळवळीत सक्रिय सहभाग असायचा. दलित शाहिरी हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. दलित विद्यार्थ्यांत ते लोकप्रिय होते. विद्यार्थ्यांसाठी झटणारा प्राध्यापक, अशीच त्यांची ओळख होती. ते शांत स्वभावाचे व्यक्तिमत्त्व होते. 

Web Title: dr. krishna kirawale murder