डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींचे महानिर्वाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

एक नजर

  • कोल्हापूर  येथील लक्ष्मीसेन जैन मठाचे मठाधीश आणि जैन तत्वज्ञानाबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक चळवळीचे प्रणेते स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी (वय 78) यांचे आज पहाटे महानिर्वाण
  • डॉक्‍टरेट मिळवलेले पहिले महास्वामीजी अशीही त्यांची ओळख. 
  • शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन जैन मठात शुक्रवारी सकाळी सात ते आठ या वेळेत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार
  • शुक्रवारी दुपारी दोन वाजता रायबाग (कर्नाटक) येथील लक्ष्मीसेन विद्यापीठ येथे होणार अंत्यसंस्कार

कोल्हापूर - येथील लक्ष्मीसेन जैन मठाचे मठाधीश आणि जैन तत्वज्ञानाबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक चळवळीचे प्रणेते स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी (वय 78) यांचे आज पहाटे महानिर्वाण झाले. पहाटे सव्वातीनच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्‍टरेट मिळवलेले पहिले महास्वामीजी अशीही त्यांची ओळख होती. 

दरम्यान, उद्या (शुक्रवारी) सकाळी सात ते आठ या वेळेत शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन जैन मठात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. दुपारी दोन वाजता रायबाग (कर्नाटक) येथील लक्ष्मीसेन विद्यापीठ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

तमिळनाडूमधील गुडलूर येथे दोन ऑगस्ट 1942 साली त्यांचा जन्म झाला. 1953 साली शिक्षणाच्या निमित्ताने ते कोल्हापुरात आले. येथे लक्ष्मीसेन स्वामीजींच्या सानिध्यात त्यांचे अध्ययन सुरू होते. वयाच्या तेवीसाव्या वर्षी त्यांनी भट्टारक दीक्षा घेतली. त्यानंतरही त्यांचे शिक्षण सुरूच होते. हिंदीमध्ये प्रवीण, संस्कृतमध्ये काव्यतीर्थ, अर्धमागधीमध्ये त्यांनी "एमए' केले आणि वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी 2015 साली त्यांनी शिवाजी विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड, संस्कृत, प्राकृत, अर्धमागधी, इंग्रजी अशा बारा भाषा त्यांना अवगत होत्या. 

शुक्रवार पेठेतील मठाच्या परिसरात 41 फूट उंचीचे मानस्तंभ, ज्वालामालिनी मंदिराची निर्मितीबरोबरच पंचकल्याणक, मौजीबंधन, मंदिर जीर्णोद्धार, प्रायश्‍चित्त संस्कार, प्रवचन अशा धार्मिक कार्यात ते सक्रीय होते. अहिंसा, व्यसनमुक्तीबरोबरच सुसंस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी, यासाठी आयुष्याच्या अखेरच्या श्‍वासापर्यंत प्रबोधनावर भर दिला. येथील महावीर उद्यानात भगवान महावीर यांच्या स्मारकासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. 

श्री लक्ष्मीसेन दिगंबर जैन ग्रंथमाला प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजअखेर 78 ग्रंथांचे प्रकाशन झाले असून त्यात त्यांनी लिहिलेल्या बारा ग्रंथांचा समावेश आहे. "रत्नत्रय'चे शंभरहून अधिक संग्राह्य विशेषांक त्यांनी प्रकाशित केले. महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे ते संस्थापक अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. 1984 पासून गेल्या वर्षीपर्यंत या माध्यमातून महाराष्ट्र व कर्नाटकात तेवीस जैन साहित्य संमेलने त्यांनी घेतली. श्री लक्ष्मीसेन विद्यापीठ शिक्षा संस्थेच्यावतीने कोल्हापूरसह रायबाग व बेळगावमध्ये विविध शिक्षण संस्था चालवल्या जातात. 

दरम्यान, भट्टारकरत्न, शांतमूर्ती, धर्मदिवाकर, संहितासुरी, जगद्‌गुरू, सद्‌गुरू, संस्कृती संरक्षक, चारित्र्यभूषण, धर्मालंकार, स्याव्दादप्रतिष्ठापनाभूषण, ज्ञानभास्कर, भट्टारकशिरोमणी, विद्यावाचस्पती, भट्टारकचूडामणी, विमुक्तीमार्गप्रबोधक, धर्मभूषण शिरोमणी, धर्मरत्नाकर, साहित्यरत्न आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले होते. 

भगवान महावीर स्मारक 
येथील महावीर उद्यानात भगवान महावीर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून स्मारकासाठी महास्वामींजींचा पाठपुरावा सुरू होता. गेल्या गुरूवारीच त्यांनी महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे आदींसह उद्यानातील जागेची पाहणी केली होती. 

तरूणांपुढे आदर्श 
सुरवातीपासूनच धार्मिकतेकडे ओढा असलेल्या महाराजांचे मूळ नाव कुमार चंद्रकीर्ती. सौ. वसुंधरादेवी व आदिनाथ जैन यांचे हे सुपुत्र. 1953 ला वयाच्या अकराव्या वर्षी महाराज काही जैन मुनींबरोबर कोल्हापुरात आले अन्‌ कोल्हापूरचे होऊन गेले. तमिळनाडूचे असूनही त्यांनी मराठी भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळविले. ते सर्वांशी अस्खलित मराठीतून बोलायचे. धर्मविद्या संपादन केल्यावर त्यांना 1965 मध्ये दीक्षा देण्यात आली. त्या काळच्या रिवाजानुसार त्यांनी आपल्या गुरूंची सेवा करून, त्यांच्याकडून ज्ञान संपादन करून त्यांचा विश्‍वासही संपादन केला. कारण या मठाला फार मोठी परंपरा आहे.

कोल्हापूरबरोबरच रायबाग व होसूर (कर्नाटक), पेनगोंडी (आंध्र प्रदेश), जिनकंची (तमिळनाडू) व दिल्ली येथे मठाच्या शाखा आहेत. त्याची देखभाल करून मठाचा कार्याचा विस्तार करणे मठाचा नावलौकिक वाढविणे, समाजाची सेवा करणे या सगळ्या कसोट्यांवर आपला हा शिष्य उतरेल याची खात्री पटल्यानंतरच त्यांना गुरूंनी दीक्षा दिली व पट्टाचार्य भट्टारक स्वस्तीश्री लक्ष्मीसेन महाराज या पीठावर त्यांना 18 डिसेंबर 1965 ला मोठ्या समारंभपूर्वक विराजमान करण्यात आले.

देश व परदेशात त्यांचे व्यसनमुक्ती व सुसंस्कारासाठी समाजप्रबाधनाचे कार्य अविरत सुरू राहिले. इंग्लंड, कॅनडा, नेपाळचा दौरा त्यांनी केला. "जैनॉलॉजी'मधून त्यांनी केलेले संशोधन शिवाजी विद्यापीठाने स्वीकारून त्यांना डॉक्‍टरेट जाहीर केली. या सगळ्या संशोधनाच्या प्रवासात त्यांना आजाराने ग्रासले. त्यावरही मात करून त्यांनी हे संशोधन पूर्ण करून तरुणांसमोर आदर्श ठेवला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Laxmisen Bhattarak Pattacharya Mahaswami no more