डॉ. मोहन आगाशे 'भावे पुरस्कारा'चे मानकरी 

डॉ. मोहन आगाशे 'भावे पुरस्कारा'चे मानकरी 

सांगली : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा यंदाचा आद्यनाटककार विष्णूदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना जाहीर झाले आहे.

प्रथेप्रमाणे येत्या 5 नोव्हेंबरला रंगभूमीदिनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष भूषवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री किर्ती शिलेदार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पंचवीस हजार रुपये गौरव पदक, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष शरद कराळे यांनी आज पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. 

मराठी रंगभूमीवर प्रदिर्घ सेवा करणाऱ्या रंगकर्मीला पुरस्कार देण्यात येतो. 1959 मध्ये पहिल्यांदा बालगंधर्व यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, ग.दि.माडगूळकर, हिराबाई बडोदेकर, विठाबाई नारायणगांवकर,प्रभाकर पणशीकर,विद्याधर गोखले, विजया मेहता, सत्यदेव दुबे, श्रीराम लागू, निळू फुले, दिलीप प्रभावळकर, महेश एलकुंचवार, डॉ जब्बार पटेल, विक्रम गोखले यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांना हा पुरस्कार मिळाला आहे. गतवर्षी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना हा पुरस्कार मिळाला होता. 

यंदा ज्येष्ठ दिगदर्शक सत्यजीत राय यांच्याकडून "भारतातील बुध्दीमान नट' असा गौरव प्राप्त झालेल्या आगाशे यांना आता मराठी रंगभूमीवर सर्वोच्च बहुमान समजला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे. पेशाने मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या आगाशे यांची मराठी रंगभूमीवरील ओळख विजय तेंडुलकरांच्या घाशीराम कोतवाल नाटकाने खऱ्या अर्थाने झाली. या नाटकातील त्यांनी रंगवलेला कामूतर नाना फडणवीस अशा काही नेटाने साकारला की ती त्यांची ओळख होऊन गेली. खरेतर त्यांच्यासारखा समृध्द अभिनेता कोणा एका भूमिकेच्या चौकटीत अडकणे शक्‍य नाही हे त्यांनी पुढे सिध्द केले.

1958 मध्ये राज्य नाट्यस्पर्धेच्या मंचावरून त्यांची सुरु झालेली नाट्या कारकिर्द आजही अखंडपणे सुरु आहे. त्यांच्या जैत रे जैत आणि सामना या चित्रपटांमधील भूमिकांनी ते चित्रपटसृष्टीत स्थिरावले. तीन चोक तेरा (1966), दिनूच्या सासूबाई राधाबाई (1968), राजा नावाचा गुलाम, क्षण झाला वैरी (1969), तीन पैशाचा तमाशा (1978), बेगम बर्वे (1979), सावर रे (1999), वासांसी जीर्णानी (2000), काटकोन त्रिकोण (2010) अशी नाटके मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरतील अशी आहेत.

मराठी, हिंदी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतीतील एक चरित्र अभिनेते म्हणून त्यांची ओळख आहे. एक व्यस्त कलाकार असूनही त्यांनी बालरंगभूमीसाठीही तितक्‍याच आस्थेने काम केले आहे. एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून त्यांनी स्वंयसेवीपणे सामाजिक योगदान दिले आहे. भावे पुरस्काराने त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीवर शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक केळकर यांच्यासहऍड. विनायक ताम्हणकर,मेधा केळकर, जगदीश कराळे, आनंदराव पाटील, बलदेव गवळी, विलास गुप्ते, भास्कर ताम्हणकर आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com