डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले 'हे' पुरग्रस्त गाव दत्तक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

सांगली - पूरपश्चात उपाययोजनांसाठी सर्व यंत्रणा प्रयत्नांची शिकस्त करत असल्याचे सांगून शासकीय मदत वाटपात दिव्यांग, एकल महिला, ज्येष्ठ नागरिक यांना  प्राधान्य द्या. त्यांना घरी जावून मदतीचे वाटप करा. विविध महामंडळांच्या माध्यमातून आवश्यक मदत उपलब्ध करून घ्या, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  यांनी दिले.

सांगली - पूरपश्चात उपाययोजनांसाठी सर्व यंत्रणा प्रयत्नांची शिकस्त करत असल्याचे सांगून शासकीय मदत वाटपात दिव्यांग, एकल महिला, ज्येष्ठ नागरिक यांना  प्राधान्य द्या. त्यांना घरी जावून मदतीचे वाटप करा. विविध महामंडळांच्या माध्यमातून आवश्यक मदत उपलब्ध करून घ्या, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  यांनी दिले. यावेळी त्यांनी सांगली नगरवाचनालयासाठी त्यांच्या फंडातून 5 लाख रूपयांची मदत करत असल्याचे तसेच उभारी देण्यासाठी अंकली हे गाव दत्तक घेत असल्याचे सांगितले.     

जिल्ह्यातील सांगलीवाडी, अंकली, हरिपूर रोड, रामनगर, जुनी धामणी आदी विविध ठिकाणी डॉ. गोऱ्हे यांनी भेट दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पूरस्थिती व पूरपश्चात करण्यात येणाऱ्या उपाययोजना यामध्ये धान्य वाटप, मदत, सानुग्रह अनुदान आदीबाबत सविस्तर आढावा घेतला.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, विशेष कार्य अधिकारी रविंद्र खेबुडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. तेली यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

महिलांना कपडे पुरवावेत - डाॅ. गोऱ्हे

डॉ. गोऱ्हे  म्हणाल्या, ज्या ठिकाणी दिव्यांग, एकल महिला, ज्येष्ठ नागरिक पुरबाधित आहेत त्यांना घरी जावून मदतीचे वाटप करा. आज ग्रामीण भागामध्ये भेटी देत असताना महिलांच्या कपड्याची उपलब्धता होणे आवश्यक असल्याचे जाणवले. दानशूर व्यक्तींनी प्राधान्याने ही मदत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

सांगली नगरवाचनालयास पाच लाखांची मदत

सांगली नगरवाचनालयाचे महाप्रलयामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी डाॅ गोऱ्हे यांनी त्यांच्या फंडातून पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली. तसेच जिल्ह्यातील जी वाचनालये पुरबाधित झाली असतील त्यांनीही प्रशासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव दाखल करावेत असे सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Nilam Gorhe visit to Flooded area in Sangli District