सकाळी निरोप, दुपारी बढती, सायंकाळी निवृत्ती!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

कोल्हापूर - वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून नोकरीच्या शेवटच्या दिवशी त्यांचा निरोप समारंभ सुरू होता. त्याचवेळी त्यांना संदेश आला, त्यांना पोलिस महानिरीक्षक म्हणून बढती मिळाली होती. समारंभातूनच ते पुण्यात आपल्या नव्या पदावर हजर व्हायला गेले. हजरही झाले आणि त्याच दिवशी सायंकाळी ते अवघ्या एक दिवसाच्या बढतीनंतर निवृत्त झाले. प्रभाकर बुधवंत या ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने काल (ता. ३०) पोलिस प्रशासनातले हे काहीसे गोड अन्‌ काहीसे कडवट क्षण अनुभवले. 

श्री. बुधवंत कोल्हापुरात तीन वर्षे उपअधीक्षक होते. येथून बदली होऊन गेल्यानंतरही त्यांचे कोल्हापुरातील नाते कायम आहे.  सध्या ते रेल्वे दलाचे पोलिस अधीक्षक होते. काल त्यांच्या निवृत्तीचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे त्यांचा निरोप समारंभ त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केला होता. समारंभात अनेक जण त्यांच्याविषयी बोलले. या समारंभात स्वतः बुधवंत आपले मनोगत व्यक्त करण्यास उठले. ते बोलत असतानाच त्यांना मोबाईलवर पुणे शहर उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून बढती मिळाल्याचा संदेश आला. 

हा संदेश येताच त्यांनी कार्यक्रम आटोपता घेतला. ते खडकीहून तातडीने पुण्यात आले. त्यांनी आपल्या नवीन पदाची सूत्रे घेतली. नवीन पदाचा दिवस मावळला आणि वयोमर्यादेच्या नियमानुसार ते त्याच दिवशी निवृत्त झाल्याचाही संदेश आला. श्री. बुधवंत यांनी हा संदेशही स्वीकारला. सकाळी निरोप समारंभ, दुपारी बढती, सायंकाळी निवृत्ती हा प्रकार त्यांनी अनुभवला. 

पोलिस खात्यात सलग ३४ वर्षे सेवा करीत असताना कायम कडूगोड अनुभव साथीला राहिले. तरीही मी लोकांच्या सेवेचे साधन म्हणून मिळेल त्या पोस्टिंगवर खात्यातील सेवा बजावली. वयोमानाच्या नियमानुसार अर्थातच काल माझ्या निवृत्तीचा दिवस होता; पण त्याच दिवशी पदोन्नतीची गोड बातमी कळाली आणि अवघ्या काही तासांची पदोन्नती अनुभवून मला निवृत्तीही मिळाली. हाही नोकरीच्या शेवटच्या दिवशी कडूगोड अनुभव माझ्या वाट्याला आला. अर्थात, एकूण सेवेचा विचार करता मी माझ्या नोकरीत खूप समाधान मिळविले. 
- प्रभाकर बुधवंत, पोलिस महानिरीक्षक

Web Title: Dr.-Prabhakar-Budhwant Senior Superintendent of Police promotion retirement