सांगली : आयुष्यात एखाद्या माणसाला जरी तुम्ही मदत केली तर त्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद फार मोठा असतो. आदिवासींकडून निरपेक्ष सेवा आणि एकमेकाला मदत करणे हीच आपली संस्कृती असल्याची शिकवण मिळाली असे पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे मुलाखतीत सांगितले. डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी मुलाखतीतून आनंदवन ते हेमलकसापर्यंतचा प्रवास आज येथे मुलाखतीतून उलगडला.
हे पण वाचा - धक्कादायक : १६ वर्षांत ९ बिबट्यांचा मृत्यू
भावे नाट्य मंदिरात ऍड. जे. जी. पाटील मेमोरियल फाऊंडेशनतर्फे डॉ. आमटे दांपत्यास "समाजभूषण' पुरस्कार ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, सांगली अर्बन बॅंकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, मराठा समाजचे ऍड. उत्तमराव निकम, डॉ. दिलीप पटवर्धन, उद्योजक सुशील हडदरे, फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय पाटील, बॅंकेचे उपाध्यक्ष एच.वाय. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हे पण वाचा - भल्या पहाटेच चार जणांवर काळाचा घाला, समोरून बस आली आणि...
पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर डॉ. शुभम हिरेमठ यांनी डॉ. आमटे दांपत्याची मुलाखत घेतली. मुलाखतीतून दोघांनी जीवनपट उलगडला. डॉ. आमटे म्हणाले, ""डॉक्टरची पदवी घेतल्यानंतर पिकनिकसाठी म्हणून बाबांनी आनंदवन येथे बोलवले. ती पिकनिक नव्हती तर तिथे काम करण्यासाठी यावे यासाठी बोलवले होते. 1972 मध्ये भूलतज्ज्ञ असलेल्या डॉ. मंदाकिनीशी ओळख होऊन प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले. सर्व प्रथा मोडून आम्ही लग्न केले. त्यानंतर कोणतीच सुविधा नसलेल्या आणि आनंदवनापासून दूर हेमलकसामध्ये आम्ही सेवा सुरू केली. आदिवासींची भाषा अवगत नसताना तसेच लॅबोरेटरी, रोग निदानाची साधने नसता एका आदिवासी रुग्णाला आम्ही बरे केले. त्यातून विश्वास निर्माण केला. आदिवासी लोकांत मिसळत असताना निरपेक्ष सेवा आणि मदत करण्याची संस्कृती त्यांच्यापासून शिकलो. नरबळीसारख्या प्रथा त्यांच्यात होत्या. मांत्रिकाचा प्रभाव होता. एका मांत्रिकाच्या मुलीला आजारातून बरे केल्यानंतर मांत्रिकाचा विरोध कमी झाला.''
हे पण वाचा - खासदारांच्या समोरच महिलांनी घेतल्या नदीत उड्या, अन्... (video)
ते म्हणाले,""1973 ते 2003 पर्यंत आमचा हेमलकसाबाहेर संपर्क नव्हता. 2003 मध्ये अमेरिकेत मराठी लोकांसमोर कार्यक्रम झाला. तेव्हा त्यांना आदिवासींचे खरे जग कळले. त्यानंतर निमंत्रणे वाढली. आज अनेक कार्यकर्ते प्रेरीत होऊन तेथे सेवा करायला येतात. साधे जीवन जगत कामाचा आनंद घेतोय. आज अनेकांकडे पैसा आहे. अन्नाची नासाडी केली जाते. तुम्ही एका माणसाला जरी मदत केली तरी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला मोठा आनंद देऊन जाईल. शहराशी फारसा संबंध येत नाही. रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांवर हल्ल्याच्या बातम्या कानावर येतात. असे हल्ले टाळायचे असतील तर डॉक्टरांनी नातेवाईकांचा विश्वास संपादन करावा. तुम्ही कोणते उपचार करता ते त्यांना समजून सांगून संवाद वाढवला पाहिजे.''
हे पण वाचा - ...तर मुख्यमंत्र्यांच्या चिंता वाढतील
डॉ. मंदाकिनी आमटे म्हणाल्या,""लग्नाचा निर्णय घेताना वेगळे आयुष्य जगायचे आहे हे लक्षात आले होते. शब्द दिला असल्यामुळे सामोरे जाण्याचे धाडस केले. माझ्या सासू साधनाताईंनी भरपूर कष्ट उपसले. त्यांना माझ्याविषयी कौतुक होते. संसार म्हटला की पटवून घ्यायचे असते त्याप्रमाणे आम्ही एकमेकांना समजून घेतले. माझे पती प्रकाश हेच माझी प्रेरणा असून आमच्या बरोबर काम करणाऱ्या सर्वांचे मिळून एक कुटुंब बनले आहे.''
माजी आमदार प्रा. शरद पाटील, सांगली अर्बन बॅंकेचे संचालक, फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
|