'पाणीबाणी टाळण्यासाठी जागे व्हा'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - महाराष्ट्रात भविष्यात पाणीबाणीची वेळ यायची नसेल तर पीकपाण्याचा ताळतंत्र घालणे हाच यावर एकमेव पर्याय असल्याचे मत पाणी आणि पर्यावरण विषयाचे अभ्यासक जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी आज व्यक्त केले.

सायबरचे संस्थापक ए. डी. शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ते कोल्हापुरात आले होते. या वेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

कोल्हापूर - महाराष्ट्रात भविष्यात पाणीबाणीची वेळ यायची नसेल तर पीकपाण्याचा ताळतंत्र घालणे हाच यावर एकमेव पर्याय असल्याचे मत पाणी आणि पर्यावरण विषयाचे अभ्यासक जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी आज व्यक्त केले.

सायबरचे संस्थापक ए. डी. शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ते कोल्हापुरात आले होते. या वेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

सिंह म्हणाले, ""महाराष्ट्रात पाणी मुबलक असताना दुसऱ्या बाजूला पाणी मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. दुष्काळ पडला की पाण्याचे महत्त्व कळते. त्यावर उपाय शोधले जातात. ज्याच्यावर चर्चा व्हायला हवी, ती मात्र होत नाही. पिके घेण्याची पद्धत (फेरा) आणि पाऊस याचे ताळतंत्र घालायला हवे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही बाबींचा ताळतंत्र घातला गेला नाही. त्यामुळे ज्या भागात चांगला पाऊस पडतो, तिथे पिके चांगली आणि ज्या भागात दुष्काळाची स्थिती आहे, तेथे पिके करपल्याचे आपण पाहतो. राजस्थानमध्ये आम्ही सात मृत नद्या जिवंत केल्या. गेल्या वर्षी लातूरमध्ये भीषण दुष्काळ होता. हा जिल्हा टॅंकरमुक्त झाला आहे. पाण्याचा थेंब आणि थेंब वाचवण्याची भूमिका घेत लोकसहभागातून ती यशस्वी करून दाखविली.

जलयुक्त शिवार ही शेतीला सधन करणारी योजना आहे. यात कंत्राटदारांचा समावेश झाला की गावचे लोक हवालदिल होतात. कंत्राटदारामार्फत कामे होऊ नये, अशी माझी सुरवातीपासून भूमिका आहे. कंत्राटदार आला की तो नफ्यासाठी काम करतो. लोकांसाठी तो काम करत नाही.''

नदीला आपण आईचा दर्जा देतो. मात्र तसे वागतो का, असा सवाल करत ते म्हणाले, ""राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर जागेवर उभे राहून प्रॉटोकॉल पाळतो. मात्र नद्यांबाबत असा कोणताही प्रोटोकॉल पाळला जात नाही. गावाची घाण नदीत धुतली जाते.''

कोल्हापुरातील नैसर्गिक साधन संपत्ती आणि पाणी पाहता हा जिल्हा परमेश्‍वराचा लाडका मुलगा असल्याचे नमूद करून सिंह म्हणाले, ""सगळ्या गोष्टी आयत्या मिळाल्या की शिस्त राहत नाही. पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमीनीचा पोत बिघडतो. त्यामुळे पाण्याचा वापर जपून होणे आवश्‍यक आहे. जलसाक्षरता ही काळाची गरज आहे. वेळीच साक्षरता नाही आली तर भविष्यात गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल.''

पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांनी सिंह यांचा परिचय करून दिला. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार श्रीपतराव शिंदे, ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्रा. जय सामंत, एम. एम. अली, डॉ. रणजित शिंदे, व्ही. एम. हिलगे, डॉ. आर. आर. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

एसटीपी बांधून उपयोग काय?
पंचगंगा नदीला खऱ्या अर्थाने पंचगंगा अशी मूळ ओळख द्यायची असेल तर प्रदूषण रोखण्यासाठी एसटीपी बांधून उपयोग नाही; तर नदीच्या पाच किलोमीटर अंतरावर सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यायला हवे. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी जेवढे पैसे खर्च होत नाहीत तेवढे पैसे नंतर उपाययोजनांवर खर्च होतात. त्यामुळे प्रदूषणमुक्तीची सुरवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी.

Web Title: Dr. Rajendra Singh