आराखडा उच्चाधिकार समितीकडे - आयुक्त दळवी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

कोल्हापूर - महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी प्रस्तावित आराखडा पंधरा दिवसांत उच्चाधिकार समितीकडे पाठविला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच महालक्ष्मी विकास आराखड्याबाबत बैठक घेतली. 

कोल्हापूर - महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी प्रस्तावित आराखडा पंधरा दिवसांत उच्चाधिकार समितीकडे पाठविला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच महालक्ष्मी विकास आराखड्याबाबत बैठक घेतली. 

श्री. दळवी म्हणाले, ‘‘महालक्ष्मी विकास आराखडा सक्षमपणे राबविला पाहिजे. आराखड्यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, याची काळजी घेतली जाईल. यापूर्वी तत्कालिन विभागीय आयुक्‍तांनी ६८ कोटींचा आराखडा शासनाला पाठविला आहे. शासनाच्या पातळीवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती या आराखड्याबाबत निर्णय घेऊन मंजुरी देईल. उच्चाधिकार समितीच्या मंजुरीनंतर हा आराखडा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.’’

या पार्श्‍वभूमीवर श्री. दळवी यांनी महापौर हसीना फरास, जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्यासमवेत प्रस्तावित आराखड्यातील जागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सांगितले, की बिंदू चौक, सरस्वती टॉकिज व व्हिनस कॉर्नर येथे पार्किंगची जागा आहे. विकास आराखड्यामध्ये या तिन्ही ठिकाणी पार्किंग, स्वच्छतागृहे या व्यवस्थांबरोबरच भाविकांनी कुठे थांबायचे, याचेही नियोजन असेल. याशिवाय महालक्ष्मी मंदिरात जाताना कोणत्या मार्गाने जावे, दर्शन कोठून घ्यायचे व बाहेर जाण्याचा मार्ग कसा असेल, याची माहिती भाविकांना फलकांद्वारे देण्यात येणार आहे. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, याचीही काळजी घेतली जाईल. पार्किंग ठिकाणापासून मंदिर कुठल्या दिशेला आहे, किती अंतरावर आहे, याबाबत फलकही लावले जातील. या सर्व बाबींचा आराखड्यात समावेश असेल, असेही श्री. दळवी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.

मंदिरावरील झुडपे काढा
मंदिरावर झाडे-झुडपे वाढली आहेत. मंदिरासह भिंतींनाही त्याचा फटका बसत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी ही झाडे-झुडपे काढून घेण्याबाबत सूचना करावी, असेही श्री. दळवी यांनी सांगितले.

Web Title: The draft of the Empowered Committee