ड्रेनेजलाईनला जोडण्याच नाहीत

डॅनियल काळे 
गुरुवार, 12 जुलै 2018

कोल्हापूर - कोल्हापूर शहरात कोट्यवधी रुपये खर्चून गेल्या काही वर्षांत ड्रेनेजलाईन टाकली आहे. परंतु, या ड्रेनेजलाईनला शौचालयांचे कनेक्‍शनच जोडले नसल्याने ही ड्रेनेजलाईन वापराविना पडून आहे. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये अक्षरशः खड्ड्यात गेले आहेत.

कोल्हापूर - कोल्हापूर शहरात कोट्यवधी रुपये खर्चून गेल्या काही वर्षांत ड्रेनेजलाईन टाकली आहे. परंतु, या ड्रेनेजलाईनला शौचालयांचे कनेक्‍शनच जोडले नसल्याने ही ड्रेनेजलाईन वापराविना पडून आहे. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये अक्षरशः खड्ड्यात गेले आहेत.

नागरिकांना शौचालयांची जोडणी करून घेण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली नसल्याने ड्रेनेजलाईन वापराविना तशीच पडून आहे. तर दुसऱ्या बाजूला सेफ्टी टाक्‍यातील अथवा काही ठिकाणी मैला थेट गटारात सोडल्याने प्रदूषणात भर पडली आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यात १०० टक्के ड्रेनेजलाईन असणे आणि ती सांडपाणी प्रक्रिया केंद्राला जोडणे बंधनकारक आहे. शहरात अनेक ड्रेनेजलाईनला नागरिकांनी शौचालयाचे कनेक्‍शनच जोडले नाही. याकडे महापालिकेने कधीच गांभीर्याने पाहिले नाही. कोल्हापूर शहराची लोकसंख्या साडेपाच लाख आहे. शहरात सुमारे एक लाख ४३ हजार मालमत्ता आहेत. यापैकी केवळ २४ हजार ५०० इतक्‍याच जोडण्या ड्रेनेजलाईनला आहेत. शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुने गावठाण अर्थातच शहरातील बहुतांशी पेठांमध्ये असणारी ड्रेनेजलाईन ही १९७४ सालची आहे. त्यावेळची शहराची लोकसंख्या, शहरातील मालमत्तांची संख्या यामुळे लहान आकाराची ड्रेनेजलाईन होती. आता ही ड्रेनेजलाईन अपुरी पडत असून, त्यावर मोठा ताण पडत आहे. पाईप जुन्या, जीर्ण झाल्याने मैला रस्त्यावर वाहतो आहे. त्यामुळे जुनी ड्रेनेजलाईन जीर्ण झाली आहे. तर नव्या ड्रेनेजलाईनला जोडण्याच नसल्याने शहरातील मैला नाल्यातून थेट नदीत मिसळण्याचा धोका आहे. मैला थेट नदीत मिसळल्याने साथीचे आजार पसरण्याचा धोका असतो.

२००६ मध्ये शहरातील ड्रेनेजलाईन बदलण्यासाठी काही प्रमाणात निधी मिळाला. २००८ मध्ये रंकाळ्यालगतची ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी निधी मिळाला. त्यामुळे शहरात ड्रेनेजलाईन असण्याचे २५ ते ३० टक्‍क्‍यांचे प्रमाण हे आता ५५ टक्के इथंपर्यंत पोचले आहे. ही बाब चांगली असली तर टाकलेल्या ड्रेनेजलाईनला शहरातील प्रत्येक घरातील शौचालयांची जोडणी असणे आवश्‍यक आहे.

ड्रेनेजलाईनला शौचालय जोडायचे झाल्यास प्रतिमीटर १७०० रुपये खुदाई खर्च आणि सुपरविझन फी १००० असे शुल्क आकारले जाते. त्यामुळे जोडणीचा खर्च चार हजार येतो. त्यामुळे नागरिकांनी जोडण्या घेतल्या नसल्याचे निदर्शनास येते.

शहरातील ड्रेनेजलाईनला नागरिकांनी जोडणी घेणे आवश्‍यक आहे. जुन्या ड्रेनेजलाईनही बदलण्याची गरज आहे. जुन्या ड्रेनेजलाईन बदलण्यासाठी काही संघटनांनी मागणीही केलेली आहे. नगरसेवकांचेही नेहमी मागणीपत्र असते. त्यामुळे या ड्रेनेजलाईनही बदलाव्याच लागणार आहेत. 
- आर. के. पाटील, अभियंता, महापालिका

राजारामपुरीत पूर्वी पाच गुंठे, दहा गुंठ्यांचे प्लॉट होते.  यामध्ये एकच बंगला किंवा घर होते. त्यांचे एकच  शौचालय होते. ते ड्रेनेजला जोडले आहे; पण अलीकडे राजारामपुरीचे व्यापारीकरण झाले. अपार्टमेंट उभ्या राहिल्या. एका शौचालयाच्या जागी ५० आणि ६० शौचालये झाली. त्यामुळे ड्रेनेजलाईनवर ताण पडत आहे. ही जुनी ड्रेनेजलाईन बदलायला हवी.
- बाबा इंदुलकर, कॉमन मॅन संघटना

Web Title: Drainage line not be connected