गटारांतील सांडपाणी जागोजागी रस्त्यांवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

सातारा - शहरात दोन दिवसांत पावसाच्या वाढलेल्या जोरामुळे पालिकेची नालेसफाई उघडी पडली आहे. पावसाळी पाण्याबरोबरच गटारांतील सांडपाणी रस्त्यांवरून वाहत आहे. त्यातूनच नागरिकांना चालावे लागत असल्याने जंतूंचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. शहराचं नाक असलेल्या पोवई नाक्‍यावरील हे चित्र आहे.

सातारा - शहरात दोन दिवसांत पावसाच्या वाढलेल्या जोरामुळे पालिकेची नालेसफाई उघडी पडली आहे. पावसाळी पाण्याबरोबरच गटारांतील सांडपाणी रस्त्यांवरून वाहत आहे. त्यातूनच नागरिकांना चालावे लागत असल्याने जंतूंचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. शहराचं नाक असलेल्या पोवई नाक्‍यावरील हे चित्र आहे.

पालिकेतर्फे दर वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर शहरात नालेसफाई मोहीम राबविली जाते. याहीवर्षीही ती राबविण्यात आली. तथापि, गेल्या दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीमुळे काही नाले अक्षरश: रस्त्यावर आले. पोवई नाक्‍यावर रयत शिक्षण संस्थेच्या दारात, पदपथाखाली एक गटार वाहते. महाराजा सयाजीराव विद्यालयालगत हे गटार रस्त्यावर आले आहे. पुढे प्रेस्टीज चेंबरर्स व विठ्ठल लीला कॉम्प्लेक्‍स या इमारतींसमोरील गटारे पावसाळ्यात तुंबतात. पाऊस सुरू झाल्यापासून ही गटारे तुंबून रस्त्यावर सांडपाणी येते. सयाजीराव विद्यालयापासून विठ्ठल लीला कॉम्प्लेक्‍स, मरिआई कॉम्प्लेक्‍स, रजताद्री हॉटेल असे करत पाण्याचे लोट शिवाजी सर्कलला वळसा मारून जिल्हा रुग्णालय रस्त्याकडे वाहतात.

पोवई नाक्‍यावरून जाताना आपण रस्त्यावरून चाललो आहोत का एखाद्या ओढ्यातून असा प्रश्‍न पादचारी व वाहनचालकांना पडतो. या सांडपाण्याला प्रचंड दुर्गंधी आहे. अंगावर या पाण्याचे शिंतोडे झेलत पादचाऱ्यांना चालावे लागते. एक- दोन दिवसांचा हा प्रश्‍न नाही. आधीच या परिसरातील व्यवसाय मंदावला आहे. त्यात या सांडपाण्यामुळे परिसरातील व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हीच स्थिती चांदणी चौकात अनुभवायला मिळते. तुळजाभवानी कॉम्प्लेक्‍सकडून जुन्या पालिकेकडे वाहने गटार वारंवार तुंबून सांडपाणी रस्त्यावर येते. पावसाचे पाणी समजून लहान मुले हे पाणी पायाने एकमेकांच्या अंगावर उडवत चालतात. सांडपाण्यामध्ये अनेक घटकांचा अंतर्भाव असल्याने त्यातून जंतूसंसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.

विठ्ठल- लीला कॉम्प्लेक्‍ससमोरील सांडपाण्यासाठी नवीन व्यवस्था प्रस्तावित आहे. ग्रेडसेपरेटर कामामुळे हे काम करता येत नाही. तथापि, याठिकाणी पाणी तुंबू नये म्हणून वेळच्या वेळी नालेसफाई करण्याची सूचना आरोग्य निरीक्षकांना केली आहे.
- श्रीकांत आंबेकर, नगरसेवक

Web Title: dranage water on road rain