दुष्काळी पशुधनाला मिळणार संजीवनी!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

सातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी केली जात असून, त्यासाठी ८९ हजार क्‍विंटल बियाणांचे वाटप केले आहे. जनावरांना पुरेसा चारा मिळण्यासाठी दोन लाख मेट्रिक टन चारा उत्पादित केला जाईल, असा अंदाज प्रशासनाने बांधला आहे. 

सातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी केली जात असून, त्यासाठी ८९ हजार क्‍विंटल बियाणांचे वाटप केले आहे. जनावरांना पुरेसा चारा मिळण्यासाठी दोन लाख मेट्रिक टन चारा उत्पादित केला जाईल, असा अंदाज प्रशासनाने बांधला आहे. 

जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव या तालुक्‍यांत तसेच इतर तालुक्‍यांतील काही मंडलांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. डिसेंबर महिना सुरू असतानाच या भागात दुष्काळाच्या झळा वाढू लागल्या आहेत. शासनाने जाहीर केलेल्या यादीत माण तालुक्‍यात तीव्र तर, कोरेगाव व फलटणचा मध्यम दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, दिवसेंदिवस टंचाई तीव्र होऊ लागल्याने टॅंकरच्या संख्येत वाढ झाली आहे.

जिल्ह्यात लहान-मोठी मिळून सात लाखांहून अधिक जनावरे आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या दुष्काळी तालुक्‍यांत आहे. या जनावरांवर जानेवारीपासून चारासंकट कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रम, कामधेनू दत्तक ग्राम, वैरण विकास कार्यक्रम, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास कार्यक्रम या पाच योजनांच्या माध्यमातून चारानिर्मिती केली जाणार आहे.

चारानिर्मितीसाठी ८९ हजार २३९ क्विंटल बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. या बियाण्याची पाच हजार १७ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड केली जाणार आहे. यामधून दोन लाख नऊ हजार ११६ मेट्रिक टन चारानिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात जूनअखेरीस एक लाख २० हजार २४ मेट्रिक टन चारा कमी पडणार असल्याचा अंदाज आहे. हा कमी पडणारा चारा विविध योजनेतून उत्पादित केला जाणार आहे. यामुळे किमान चारा टंचाईवर मात करता येणार आहे. 

‘घर टू घर’ प्रशासन
चारा लागवड मोठ्या प्रमाणात होण्यासाठी उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) संजय पाटील यांनी कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत बियाणे वाटपाचे कामकाज प्रभावीपणे राबविले. हे कर्मचारी प्रत्येक घरात जावून गाळपेरासाठी अर्ज भरून घेणे, त्यांना बियाणे देण्याचे काम करत होते. त्यात एक अवकाळी पाऊस पडल्याने, तसेच उरमोडी धरणातील पाणी माणमधील काही भागांत पोचल्याने या योजनेला बळ मिळून चारा उत्पादन वाढले आहे.

७,३०,१०६ एकूण जनावरे 
१९,४०,३०२ (मेट्रिक टन) उपलब्ध चारा
१,२०,०२४ (मेट्रिक टन) कमी पडणारा चारा
२,०९,११६ (मेट्रिक टन) अपेक्षित चारा उत्पादन

Web Title: Drought Animal Wealth Fodder Administrative