दुष्काळी भाग कोकणाशी जोडणार

दुष्काळी भाग कोकणाशी जोडणार

गुहागर-कडेगाव-विजापूर महामार्गाला मंजुरी; लवकरच निविदा प्रसिद्ध

कडेगाव - केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ‘एन.एच.१६६ ई’ गुहागर-कडेगाव-विजापूर या २८३.०८० किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाला अंतिम मंजुरी दिली आहे. यासाठी लवकरच निधीही  मंजूर करून निविदाही प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 

हा महामार्ग दुपदरी आहे. भविष्यात तो चारपदरी  करण्यासाठी लवकरच जमीन अधिग्रहण केले जाणार आहे. नवा महामार्ग कोकण दुष्काळी भागाशी जोडणार आहे. अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने दुष्काळी पट्ट्यात समाधान व्यक्त केले जात आहे.

महामार्ग दुपदरी 
येत्या वर्षात रस्त्याच्या कामाला सुरवात होईल. महामार्ग दुपदरी आहे. वाहतूक वाढल्यानंतर त्याचे रूपांतर चारपदरीत होईल. राष्ट्रीय 
महामार्गात रूपांतर झाल्याने रस्त्यांचा दर्जा यापुढे कायमस्वरूपी चांगला राहणार  आहे. रस्त्याची डागडुजी व देखभालीसाठी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून तातडीने मोठा निधी मिळणार आहे. राज्याच्या तिजोरीवरील कोट्यवधींचा बोजा कमी होणार आहे.

शेती विकासाला चालना
नव्याने होणारा महामार्ग विशेष करून राज्याच्या दुष्काळी भागातून जात आहे. दुष्काळी भागाच्या विकासाला  चालना मिळेल. नागरिकांच्या वेळेची बचत होईल. कृषीमाल कमी वेळेत शहरात पाठवता येणार आहे. शेतकऱ्यांना ताजा पैसा मिळेल.

कडेगाव, विटा, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी आदी दुष्काळी पट्टयातील द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला आदी शेतमाल राष्ट्रीय महामार्गामुळे कमी वेळेत पुणे, मुंबईसह कोकण बाजारपेठेत पोहोचण्यास मदत होईल. 

औद्योगिक विकासात वाढ होणार
कडेगाव व विटा येथे एमआयडीसी आहेत. परंतु येथे एकही मोठा उद्योग नसल्याने एमआयडीसीला घरघर लागली आहे. तेव्हा ही दोन्ही ठिकाणे आता महामार्गावर आली आहेत. त्यामुळे येथील एमआयडीसीमध्ये मोठे मोठे उद्योगही येऊ शकतात. परिणामी येथे बेरोजगार तरुणांच्या हाताला कामही मिळेल. ओगलेवाडी (ता. कऱ्हाड) येथील काच कारखाना बंद पडला. त्यानंतर यापरिसरांत एकही मोठा उद्योग उभा राहिला नाही. परंतु नव्या राष्ट्रीय महामार्गामुळे नवे उद्योगही येथे येण्याची संधी निर्माण झाली आहे. तसेच येथून जवळच कऱ्हाड येथे रेल्वे स्टेशन, तसेच विमानतळही असल्याने जवळजवळ सर्वच पायाभूत सुविधा मिळू शकतात. त्यामुळे आता औद्योगिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
 

जमिनींना सोन्याचा भाव, पर्यटनही वाढणार
गुहागर-विजापूर महामार्गामुळे महामार्गाशेजारील जमिनींना सोन्याचा भाव येईल. अनेक गावे महामार्गावर येणार असल्याने तेथे बाजारपेठा वाढतील. ओगलेवाडी, कडेगाव, कडेपूर, विटा, भिवघाट, खानापूर, नागज, जत येथील जमिनींचे दर आत्ताच गगनाला भिडले आहेत. तर आता होणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गामुळे जमिनींच्या दरांत दुपटीने वाढ होण्याची शक्‍यता आहे. तसेच कडेगाव तालुक्‍यात सागरेश्‍वर, चौरंगीनाथ, डोंगराई आदी तर खानापूर तालुक्‍यातील शुक्राचार्य, रेवणसिद्ध, दरगोबा मंदिर परिसर आदी ठिकाणी पर्यटनातही वाढ होऊन विकासाला चालना मिळेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com