दुष्काळ बैठकीला दांडी; बॅंक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानवाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीस दांडी मारल्याने 12 बॅंक अधिकाऱ्यांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

नगर - शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानवाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीस दांडी मारल्याने 12 बॅंक अधिकाऱ्यांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

नेहा जोशी (आंध्र बॅंक), मंगेश कदम (इंडियन बॅंक), चरणदीप (ओरिएंटल बॅंक), माने (पंजाब नॅशनल बॅंक), जी. के. देशपांडे (युनियन बॅंक), सातपुते (महाराष्ट्र बॅंक), वसंत पिल्लेवार (देना बॅंक), सुयोग ब्राह्मणे (युनायटेड), धीरज (अलाहाबाद बॅंक), विकास निकाळजे (स्टेट बॅंक), तुकाराम गायकवाड (जिल्हा अग्रणी बॅंक) अशी त्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

याबाबत नायब तहसीलदार माधुरी आंधळे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले, की जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशान्वये आणि जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक यांच्या सूचनेनुसार 13 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकरी आणि दुष्काळी अनुदानवाटपाचा आढावा घेण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ असून, सामान्य जनता त्या दुष्काळाला तोंड देत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीचे गांभीर्य माहीत असताना वरील अधिकारी बैठकीला गैरहजर राहिले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केला. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये कोतवाली पोलिस ठाण्यात सरकारी अधिकाऱ्याचा आदेश न मानणे (188)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought Meeting Absent Bank Officer Crime