सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍यांना पावसाने झाेडपले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

या पावसामुळे काही गावांत ओढ्यांना पाणी वाढणे, भिंती कोसळने अशा घटना घडल्या आहेत. 

सातारा : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या खटाव आणि माण तालुक्‍यांत पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले आहे. या पावसामुळे काही गावांत ओढ्यांना पाणी वाढणे, भिंती कोसळने अशा घटना घडल्या आहेत. 

वडूज परिसराला आज (गुरुवार) सकाळी दोन तास जोरदार पावसाने झोडपले. पावसाने येथील ग्रामदैवत श्रीनाथ मंदिरासमोरची संरक्षक भिंत कोसळली तसेच पुसेगाव-वाकेश्वर रस्त्यावरील ओढ्यांना पाणी वाहिल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. 
आजच्या जोरदार पावसाने येरळा नदीची पाणीपातळी पुन्हा वाढली आहे. येथील ग्रामदैवत श्रीनाथ मंदिरासमोर असणारी सुमारे 20 फूट लांबीची संरक्षक भिंत पावसाने कोसळली. भिंतीनजीकच असणाऱ्या सुरभी बॅंडच्या गाडीवर त्यातील काही भाग कोसळला. येथून जाणाऱ्या ओढ्याला पूर आला होता. 

कातरखटाव परिसरात आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे परिसरातील ओढे व नाले पावसाने तुडुंब भरून वाहू लागले असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
खटाव आणि मायणी परिसरात देखील पावसाने दमदार हजेरी लावल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought-prone districts of Satara district received heavy rainfall