टंचाई निवारणासाठी नाही दमडीचाही निधी 

brought
brought

कऱ्हाड - पाणीटंचाईच्या उपाययोजना राबवण्यासाठी दुष्काळी माण- खटाव तालुक्‍यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. कऱ्हाड तालुक्‍यात सध्या टंचाईची झळ अनेक गावांना बसत आहे. तालुक्‍याचा टंचाई आराखडा तयार करून तो जिल्ह्याला मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामध्ये सुचवण्यात आलेल्या उपाययोजनांची कार्यवाही उन्हाळा संपण्यासाठी अवघे 20 दिवस राहिले, तरीही सुरू झालेली नाही. टंचाई निवारणासाठी तालुक्‍याला अद्याप दमडीचाही निधी मिळालेला नाही. 

कऱ्हाड तालुक्‍यावर पाण्यासाठी समृद्ध तालुका असा शिक्का आहे. त्यामुळे टंचाईच्या उपाययोजना राबवताना तालुक्‍यावर अन्याय होत असल्याच्या ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्या भावना आहेत. तालुक्‍यातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून पंचायत समितीकडून तालुक्‍याचा 66 लाख 56 हजार रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला. त्यामध्ये नवीन बोअर घेणे, बोअर दुरुस्ती करणे, नवीन विंधन विहिरी खोदणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करणे, विहीर खोलीकरण करणे, पाणीपुरवठा योजना दुरुस्ती करणे आदी कामांचा समावेश आहे. सध्या तालुक्‍यात अनेक गावांत टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा विचार करून शासनाने 29 गावांत टंचाइस्थिती घोषितही केली आहे. त्यामध्ये अंतवडी, बानुगडेवाडी, गोसावेवाडी, घोगाव, घोलपवाडी, हरपळवाडी, मनू, नांदगाव, ओंडोशी, पवारवाडी-नांदगाव, रिसवड, सयापूर, बामणवाडी, बाबरमाची-डिचोली, भुरभुशी, धोंडेवाडी, गायकवाडवाडी, करंजोशी, कालेटेक, म्हासोली, नांदलापूर, निगडी, ओंड, शेळकेवाडी- म्हासोली, वनवासमाची- खोडशी, वानरवाडी, म्हारुगडेवाडी, आकाईचीवाडी आणि सावरघर या गावांचा समावेश आहे.

संबंधित गावात टंचाईच्या उपाययोजना थेट सुरू झालेल्या नाहीत. सध्या अंतवडी-माळवाडी, बाबरमाडी-डिचोली पुनर्वसन, धोंडेवाडी-डिचोली पुनर्वसन, घोगाव-मदनेवस्ती, कालगाव-बेघरवस्ती, काले-बेडकीमाळ, म्हासोली-बेघरवस्ती, ओंड-बेंदमळा, ओंडोशी-गावठाण, पवारवाडी-नांदगाव, रिसवड-पिराचामाळ, सयापुर, शामगाव, वानरवाडी येथे नवीन बोअर घेण्यासाठी सध्या सर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे ही कामे पावसाळ्याच्या तोंडावर तरी होणार का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. 
 
ही आहे वस्तुस्थिती... 
- 29 गावांत टंचाईस्थिती जाहीर 
- 66 लाखांचा टंचाई आराखडा 
- आराखड्यातील उपाययोजना कागदावरच 
- नवीन बोअर घेण्यासाठी केवळ सर्वेक्षण 


टॅंकरचे फक्त दोनच प्रस्ताव 
कऱ्हाड तालुक्‍यातील 12 ठिकाणी टॅंकरने पाणी द्यावे लागणार आहे. त्यामध्ये अंतवडी, बामणवाडी व त्या अंतर्गत दोन वाड्या, भुरभुशी, मुट्टलवाडी, गोसावेवाडी, घोलपवाडी, करंजोशी, म्हारुगडेवाडी, मनव, ओंडोशी, पवारवाडी-नांदगाव या गावांचा समावेश आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार पवारवाडी- नांदगाव आणि बामणवाडी येथील टॅंकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com