सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग 

संतोष सिरसट
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

कृत्रिम पावसाची प्रतीक्षाच 
यंदाच्या हंगामात कृत्रिम पाऊस पाडण्याविषयीची चर्चा जोरात सुरू होती. त्याचे केंद्रही सोलापुरात आहे. मात्र, पावसाचे ढग जमा होऊनही त्याचा प्रयोग केला जात नसल्याने शेतकऱ्यांना अद्यापही कृत्रिम पावसाची प्रतीक्षाच आहे. हा पाऊस नेमका पाडणार तरी केव्हा? असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. 

सोलापूर : यंदाच्या हंगामातील निम्मा पावसाळा संपला आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षाच आहे. मागील दोन-चार दिवसांपासून रोजच काळेकुट्ट ढग आकाशात येतात. मात्र, ते ढग पावसाचे नसून दुष्काळाचे असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. जून ते सात ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांपैक्षी आठ तालुक्‍यांमध्ये 50 टक्‍यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या आकडेवारीवरून दुष्काळाचे ढग गडद होत असल्याचे जाणवते. 

जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 488 मिलिमीटर पाऊस पडतो. यापैकी मागील दोन महिन्यात सरासरी 226 मिलिमीटर पाऊस पडण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात 110 मिलिमीटर पावसाचीच नोंद प्रशासनाकडे झाली आहे. एक-दोन तालुक्‍यांचा अपवाद वगळता प्रत्येक तालुक्‍यात 50 टक्‍यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. कमी पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या सरासरी एकूण पावसाचा विचार केला असता केवळ 48 टक्केच पाऊस झाला आहे. मागील वर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके जोमदार आली होती.

त्यानंतर पुढील दोन महिने पाऊसच झाला नव्हता. मात्र, पहिल्या महिन्यात झालेल्या पावसाच्या जोरावर पिके तगली होती. यंदाच्या वर्षी मात्र सुरवातीच्या काळातही मोठा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. थोड्या पावसाच्या जिवावर खरिपाची पेरणी उरकली. पण, आता पाऊसच नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती जाहीर करण्याची मागणीही शेतकऱ्यांमधून केली जाऊ लागली आहे. 

-40 टक्‍यांपेक्षा कमी पावसाचे तालुके 
दक्षिण सोलापूर, करमाळा 
-45 टक्‍यांपेक्षा कमी पावसाचे तालुके 
माढा, मंगळवेढा 
-50 टक्‍यांपेक्षा कमी पावसाचे तालुके 
उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, सांगोला 
-75 टक्‍यांपेक्षा कमी पावसाचे तालुके 
बार्शी, पंढरपूर, माळशिरस 

तालुकानिहाय पावसाची सरासरी टक्केवारी 
उत्तर सोलापूर-45.12, दक्षिण सोलापूर-39.76, बार्शी-74.73, अक्कलकोट-46.25, मोहोळ-47.74, माढा-44.34, करमाळा-36.38, पंढरपूर-56.66, सांगोला-46.91, माळशिरस-52.79, मंगळवेढा-42.07, एकूण-48.43 टक्के 

कृत्रिम पावसाची प्रतीक्षाच 
यंदाच्या हंगामात कृत्रिम पाऊस पाडण्याविषयीची चर्चा जोरात सुरू होती. त्याचे केंद्रही सोलापुरात आहे. मात्र, पावसाचे ढग जमा होऊनही त्याचा प्रयोग केला जात नसल्याने शेतकऱ्यांना अद्यापही कृत्रिम पावसाची प्रतीक्षाच आहे. हा पाऊस नेमका पाडणार तरी केव्हा? असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. 

खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके फुलोऱ्यात आहेत. पण, पाऊस नसल्याने ती वाळून जाऊ लागली आहेत. तूर व बाजरी ही पिके थोडे दिवस तग धरून राहू शकतात. वातावरणात बदल जाणवत आहे. एक-दोन दिवसात पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. 
- बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: drought situation in Solapur