पाण्याची एवढी वाईट स्थिती नव्हती

अण्णा काळे
गुरुवार, 16 मे 2019

दररोज जनावरांना हिरवा चारा दिला जातो. पाण्याची चांगली सोय केली आहे. सरकारने छावणीचे अनुदान वाढवून दिले, तर जनावरांना आणखी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता येतील.
- जिजिबा हगारे, छावणीचालक, हवालदारवस्ती, करमाळा

करमाळा - ‘‘१९५२ चा दुष्काळ पाहिला... १९७२ चा दुष्काळ पाहिला... या दोन्ही मोठ्या दुष्काळाच्या वेळी पाणी मिळालं. पण, अन्नधान्य व जनावरांना चारा मिळत नव्हता. या दुष्काळात उलट चित्र आहे. अन्नधान्याची तर अजिबात कमतरता नाही... छावण्या उघडल्यानं जनावरांना चारा मिळतोय.

मात्र, पिण्याच्या पाण्याचे मोठे हाल होत आहेत... पाण्याची एवढी वाईट परिस्थिती जसं कळतंय तसं कधीच आली नव्हती... आयुष्य या जनावरांत गेलं. आता ही जनावरं विकूबी वाटत नाहीत. आमच्या काळात अशा छावण्या नव्हत्या... तवा चाऱ्यावाचून जनावरं मरायची. आता सरकारनं छावण्या तरी दिल्यात, तेवढं बरं हाय...’’

दुष्काळाचा पट मांडताना १०२ वर्षांचे पांडुरंग गावडे अगतिक झाले होते. जनावरांवर आलेली वेळ पाहून त्यांना भरून आले होते. विहाळचा भैरवनाथ कारखाना ओलांडला, की पुढच्या माळरानावर हवालदारवस्तीच्या बाजूला चारा छावणी नजरेस पडते. ही चारा छावणी कोर्टी येथील आदर्श लोकविकास ग्रामीण बिगर पतसंस्थेच्या वतीने चालविण्यात येते. या छावणीला भेट दिली असता गावडे यांनी मनातले दुःख व्यक्त केले. ते १० जनावरे घेऊन महिनाभरापासून छावणीवर मुक्कामी आहेत. झोपायला बाज ठेवली आहे. घरून सकाळ-संध्याकाळ जेवण येते.

Web Title: Drought Water Shortage