सायब... आमची वडिलांशी भेट घालू नका! 

crime
crime

सोलापूर : पसंत नसलेल्या मुलांशी लग्न करावं म्हणून घरातील सगळ्यांनी आमच्या मागे तगादा लावला होता... गायी-म्हशी चरवण्यापासून घरात सगळी कामं आम्ही करायचो... भाऊ मफा तर आम्हाला फारच क्रूर वागणूक देत होता... प्यायला पाणी मागून आकडे मोजायचा, 10 म्हणायच्या आधी पाणी दिले नाही तर काठीने मारायचा... आई, वडील, भाऊ आणि बहिणीच्या क्रूर वागण्याचा आम्हाला कंटाळा आला होता... म्हणूनच आम्ही तिघांना मारलं... असं सांगताना धुना आणि वसन जाधव या दोघी बहिणींनी वडिलांची भेट घालू नका, त्यांचं तोंड पाहण्याची आमची इच्छा नाही, असे पोलिसांना सांगितले आहे.

कारखान्यावर आलेल्या तरुणाशी प्रेमसंबंध 
उसाचा ट्रॅक्‍टर घेऊन सिद्धनाथ साखर कारखान्यावर आलेल्या अंबाजोगाईच्या एका तरुणाशी नजरानजर होऊन धूनाचे प्रेमसंबंध जुळले होते. आई, भाऊ आणि बहिणीचा खून केल्यानंतर त्या दोघी बसने अंबाजोगाईला गेल्या. तिथे धुनाने प्रियकराची भेट घेतली. त्याने तुम्ही येथून आता गुजरातला जा... असे म्हणून पाठवून दिले होते. त्यानंतर गुजरातला नातेवाइकांकडे जाणार होत्या. 

आमचे अपहरण झाले आहे
धुना आणि वसन या दोघींनी एसटी बस प्रवासात दुसऱ्या प्रवाशाचा मोबाईल घेऊन वडील रणसोड जाधव यांच्याशी रविवारी सकाळी संपर्क केला. आमचे अपहरण झाले आहे असे सांगून वडिलांची दिशाभूल करण्याचा दोघींनी प्रयत्न केला. पण पोलिसांनी कॉल आलेल्या मोबाईलवर संपर्क करून शोध चालू ठेवला. 

एसटी बस थेट नेली पोलिस ठाण्यात 
एसटी बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना तपासकामात मदत झाली. तुळजापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या एसटी बसमध्ये धुना आणि वसन हे आहेत की नाही हे पाहण्यासाठी पोलिसांनी बसवाहक बी. व्ही. मुंढे, चालक सूरज डोईफोडे यांच्याशी संपर्क केला. दोघींचे फोटो त्यांना पाठविले. वाहकाने व्हिडिओ पाठवून धुना आणि वसन या दोघी बसमध्ये असल्याचे सांगितले. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी बस यवत पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले. पोलिसांच्या सांगण्यानुसार बस थेट पोलिस ठाण्याच्या आवारात नेण्यात आली. तिथे पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतले. 

चोवीस तासात बदला घेते
घटनेच्या एक दिवस आधी पाण्याच्या कारणावरून भाऊ मफा याने धूनाला मारहाण केली होती. चिडलेल्या धुनाने 24 तासांत बदला घेण्याची धमकी दिली होती. हे आई आणि बहिणीलाही माहीत होते. रोजच्याच क्रूर वागण्यामुळे दोघी बहिणींनी आई, भाऊ आणि बहिणीचा जीव घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

यांनी केली कामगिरी 
पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक उमेश धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक बाबूराव म्हेत्रे, हेमंत भंगाळे, पोलिस हवालदार नारायण गोलेकर, मल्लिनाथ चडचणकर, संदीप काशीद, संभाजी खरटमल, विजयकुमार भरले, मारुती रणदिवे, विवेक सांजेकर, सचिन वाकडे, दिलीप राऊत, महिला पोलिस हवालदार अनिता काळे, पोलिस नाईक रवी माने, बाळू चमके, लालासिंग राठोड, पोलिस शिपाई आसिफ शेख, सागर शिंदे, अमोल गावडे, सचिन गायकवाड, चालक सहायक फौजदार गुंडप्पा सुरवसे, इस्माईल शेख यांनी ही कामगिरी बजाविली आहे. 

गेल्या तीन वर्षांपासून धुना आणि वसन जाधव या दोघींना घरात आई, वडील, भाऊ आणि बहीण त्रास देत होते. घरच्यांनी लग्नासाठी ठरविलेली स्थळे त्यांना पसंत नव्हती. त्या आणि रोजच्या त्रासाला दोघीही कंटाळल्या होत्या. शुक्रवारी सकाळी चिडलेल्या धुनाने भाऊ मफाला मारले. वसनने बहीण लाखीला मारले. तर दोघींनी मिळून आईच्या डोक्‍यात गज आणि पहार घालून जीव घेतला. रणसोड जाधव यांच्या झोपडीतील खड्डा खोदून पैसे धुना आणि वसन यांनी नेले नव्हते. ते पैसे वडील रणसोड जाधव यांनीच गावाला जाताना नेले होते. 
- विजय कुंभार, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com