कडेगाव तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे आले पिकांवर करप्या

संतोष कणसे
Tuesday, 6 October 2020

कडेगाव : तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूरस्थितीमुळे आले पिकावर कुज, करपा व आदी रोगांचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे.

कडेगाव : तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूरस्थितीमुळे आले पिकावर कुज, करपा व आदी रोगांचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. 

गतवर्षी अतिवृष्टी व महापूर यामुळे आले पिकाची मोठ्या प्रमाणात कुज झाली होती. तर यावर्षीही अतिवृष्टी व पूरस्थितीचा फटका आले पिकाला बसल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शासनाने आले उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरु लागली आहे. 
तालुक्‍यात चालुवर्षी शेतकऱ्यांनी पारंपरिक ऊस पिकाला फाटा देत आले पिकाची मे व जून महिन्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली. यासाठी शेतीची मशागत, ठिबक सिंचन, हजारो रुपयांचे शेणखत तर महागडे बियाणे घेत एकरी तब्बल अडीच ते तीन लाख रुपये खर्च केले आहे. 

ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कडेगाव तालुक्‍यासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले तर बागायत पिकांना देखील याचा मोठा फटका बसला. दरम्यान, पुराचे व अतिवृष्टीचे पाणी शेतात साचून राहिल्याने आले पिकाची मोठ्या प्रमाणात कुज होण्यास सुरुवात झाली. ऊन, पाऊस आणि सकाळी पिकावर पडणारे दव यामुळे पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे पीक कोमेजून जात असून पिकांची पाने पूर्णपणे करपली आहेत.

तसेच कुज होण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 
तालुक्‍यात चालुवर्षी आले पिकाची लागवड सुमारे सातशे हेक्‍टरवर झाली असून यापैकी सुमारे अडीचशे ते तीनशे हेक्‍टर क्षेत्राला अतिवृष्टी व परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. निम्म्याहून अधिक क्षेत्र पूर्णपणे वाया गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी एकरी खर्च केलेले अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे. शासनाने आले उत्पादकांना नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to heavy rains in Kadegaon taluka, taxes were levied on crops