मुलीला ऑनलाईन शिक्षण मिळावे म्हणून आईने घेतला 'हा' निर्णय

मिलिंद देसाई
Wednesday, 5 August 2020

गरीब कुटुंबातील महिलेची धडपड ... 

बेळगाव : सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाते. मात्र सर्वांकडेच स्मार्ट फोन उपलब्ध  नसल्याने अनेकांना ऑनलाईन शिक्षण घेण्यास अडचण येत आहेत. या गोष्टीला फाटा देत, दहावीत शिकत असलेल्या आपल्या मुलीला ऑनलाईन शिक्षण मिळावे यासाठी शहरातील सरोजनी बेविनकट्टी या महिलेने स्वत:ची सोन्याची कर्णफुले विकुन स्मार्टफोन खरेदी करीत तिच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवला आहे. घरची परिस्थिती गरीबीची असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा - ...तर कोल्हापूरातील खासगी रुग्णालयांचे परवाने होणार रद्द.... 

आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अनेक पालक स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र गरीबीमुळे अनेकांना स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी घरातील काही वस्तुंची विक्री करावी लागते. मुलीला स्मार्टफोन खरेदी करून देण्यासाठी सरोजनी बेविनकट्टी या क्‍लब रोडला कर्णफुले विक्रीस बसल्या होत्या. याबाबत अनेकानी त्यांच्याकडे विचारणा केली असता, मुलीच्या शिक्षणासाठी  त्यांनी ही कर्णफुले विकण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

मुलीच्या शिक्षणासाठी सरोजनी यांनी घेतलेल्या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले. बेविनकट्टी या घरोघरी जाऊन जोगवा मागतात. त्यांच्या मुलाला रेल्वे अपघातात अपंगत्व आले असल्याने तो घरीच असतो. त्यांची मुलगी सरदार्स हायस्कुलमध्ये शिक्षण घेत आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास विलंब झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करुन दिले जात आहे. मात्र बेविनकट्टी यांच्या मुलीकडे मोबाईल नसल्याने तिचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी कर्णफुले विकून  दहा हजार रुपयांचा मोबाईल विकत घेतला आहे. 

हे ही वाचा - मुसळधार पावसामुळे कोल्हापूर शहर तुंबले ; अनेक रस्ते वाहतुसीसाठी बंद...

सध्या कोरोनाच्या संकटामुळे अनेकांना विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्यांची परिस्थिती हालाखिची आहे. त्यांना घर सांभाळने कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मुलीने वेळेत शिक्षण घ्यावे यासाठी बेविनकट्टी यांची सुरु असलेली धडपड सर्वांसाठी एक आदर्श ठरणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to online education and mother take good decision in belgaum