महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो..!; भाविकांचा महाद्वार घाटात जयघोष

मोहन काळे
शुक्रवार, 12 जुलै 2019

पंढरपुरात आज आषाढी एकादशीच्या दिवशी पोलिस यंत्रणेने चांगले नियोजन केल्यामुळे भाविकांना गर्दीचा त्रास सहन करावा लागला नाही. त्यामुळे हरिनामाचा गजर करतच भाविकांनी पोलिस यंत्रणेचा जयघोष केला. महाराष्ट्र पोलीसांचा विजय असो...!! अशा घोषणा भाविक देत होते.

रोपळे बुद्रूक ( सोलापूर) : आषाढी वारीसाठी पंढरपुरात आलेल्या भाविकांचा आज (शुक्रवार) महाद्वार घाटातील प्रवास सुखाचा झाला. पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे भाविकांची गर्दीच्या त्रासातून सुटका झाली. त्यामुळे महाद्वार घाटात आज पहिल्यांदाच हरिनामाच्या जय घोषाबरोबरच महाराष्ट्र पोलिसांचाही जयघोष घुमला. महाराष्ट्र पोलिस की जय..! या जयघोषामुळे पोलिसांना अधिक चांगले नियोजन करण्यासाठी बळ मिळाले.

पंढरपुरात आज आषाढी एकादशीच्या दिवशी पोलिस यंत्रणेने चांगले नियोजन केल्यामुळे भाविकांना गर्दीचा त्रास सहन करावा लागला नाही. त्यामुळे हरिनामाचा गजर करतच भाविकांनी पोलिस यंत्रणेचा जयघोष केला. महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो...!! अशा घोषणा भाविक देत होते.

आषाढी वारीसाठी पंढरपुरात सुमारे दहा लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे चंद्रभागा नदीपात्र व विठ्ठल मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यंदाच्या वारीला भाविक मोठ्या संख्येने येणार असल्यामुळे पंढरपुरात मोठा पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.

चंद्रभागेचे स्नान व पुंडलिकाच्या दर्शनानंतर विठुरायाच्या दर्शनासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे भाविकांना महाद्वार घाटातून जाताना मोठे दिव्य पार करावे लागते. महाद्वार घाटात भाविकांना गर्दीचा त्रास हसन करावा लागत होता. भाविकांना हा त्रास होऊ नये, म्हणून पोलिसांनी एक वेगळीच शक्कल लढवली. भाविक येतील तसे न सोडता त्यांना दोन टप्यात रस्सीच्या साहाय्याने थांबवून पुढे सोडले जात होते. त्यामुळे महाद्वार घाटातील प्रवास सुखाचा झाला. साधारण तीनशे ते साडेतीनशे फुटापर्यंत मोठ्या गर्दीत उभ्या असलेल्या भाविकांना थांबवून एकदम सोडले जात होते.

पहिल्या गटाने महाद्वार घाट चढला, की लगेच दुसरा गट सोडला जात होता. त्यामुळे मोठी गर्दी असूनही भाविकांना या गर्दीचा त्रास झाला नाही. त्यामुळे भाविकांनी हरिनामाच्या जयघोषाबरोबरच पोलिस यंत्रणेचाही जयघोष करायला सुरवात केली. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचा याकामी अधिक उत्साह वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to police machinery devotees travel comfortly in Mahadwar Ghat