पुरामुळे पंढरपूरमधील पाचशे कुटुंबांना हलविले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

जिल्हाधिकारी डॉ. भोसले : भीमेत दोन लाख क्‍यूसेस पाणी येण्याची शक्‍यता 

सोलापूर : नीरा आणि भीमा नदीवरील धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने या दोन्ही नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराचा सामना करण्यासाठी जिल्ह्याची आपत्कालिन यंत्रणा सज्ज असून पंढरपूरमधील नारायणनगर व व्यासनगरमधील पाचशे कुटुंबांचे स्थलांतर केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

या कुटुंबांना पंढरपुरातील 65 एकरात व रेल्वेच्या जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे. नदी काठच्या गावांनी पाणी येण्याची वाट पाहता सुरक्षित जागी स्थलांतरित व्हावे असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे. उद्या (मंगळवार) दुपारपर्यंत उजनी धरण शंभर टक्के भरेल. उजनी व वीर धरणातून भीमा नदीत दोन लाख क्‍यूसेस पाणी सोडण्याची शक्‍यता आहे. एक लाख 80 हजार क्‍यूसेस पाणी सोडल्यानंतर पंढरपूरमध्ये पुरस्थिती येते. 

मागणी असेपर्यंत टॅंकर आणि छावण्या 
जिल्हा प्रशासन एकीकडे पुरस्थितीचा सामना करण्यासाठी नियोजन करत असताना जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या पन्नास टक्के पाऊस झाला आहे. सध्या जिल्ह्यात चारशे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 280 छावण्या सुरू आहेत. टॅंकर व छावणीची मागणी जो पर्यंत आहे तो पर्यंत या उपाययोजना राबविल्या जातील. त्यासाठी सप्टेंबर किंवा ऑक्‍टोंबर उजाडला तरीही अडचण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dur to floods moved five hundred families from Pandharpur