उपनगराध्यक्ष, स्वीकृत सदस्य निवडीकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

इस्लामपूर - नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्षपदासाठी २३ डिसेंबरला निवडी होणार आहेत. नव्या कारभाऱ्यांच्या सत्तेत कोण उपनगराध्यक्ष होते आणि स्वीकृत सदस्य म्हणून कोणाला संधी मिळते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या दादासाहेब पाटील यांचा कल कुणाकडे राहतो हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

इस्लामपूर - नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्षपदासाठी २३ डिसेंबरला निवडी होणार आहेत. नव्या कारभाऱ्यांच्या सत्तेत कोण उपनगराध्यक्ष होते आणि स्वीकृत सदस्य म्हणून कोणाला संधी मिळते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या दादासाहेब पाटील यांचा कल कुणाकडे राहतो हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देत विकास आघाडी सत्तेत आली. राष्ट्रवादी व आघाडीला चौदा जागांचे समान बलाबल मिळाले आहे. आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार निशिकांत पाटील यांची थेट निवड झाल्याने आघाडीची सत्ता जमेत आहे. त्यातही अपक्ष दादासाहेब पाटील यांचे मत विचारात घेतल्याने एखाद्या विषयावर बहुमत होण्यासाठीचे पारडे जड होणार आहे. दादासाहेब पाटील यांचा कल राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिल्यास राष्ट्रवादीचा एक स्वीकृत सदस्य वाढेल. त्यासाठी राष्ट्रवादीकडूनही प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, निकालानंतर लगेचच दादासाहोब पाटील हे आमचेच असून ते आमच्यासोबत राहतील, त्यांनी खासदार राजू शेट्टींना तसा शब्द दिला आहे असे विधान नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केले होते. या विषयावर दादासाहेब पाटील यांनी अद्यापपावेतो मौन बाळगल्याने विषयात रंगत निर्माण झाली आहे.

२२ डिसेंबरला जुन्या सदस्यांची मुदत संपेल. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी नवे सत्ताधारी शहर विकासाचे ढोल वाजविण्यास सज्ज होतील. आघाडीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदींचा सहभाग आहे. उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य म्हणून कुणाला संधी मिळते आणि पालिकेच्या राजकारणात विविध घटकपक्ष एकत्र येऊन कसे कामकाज करतात, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष राहणार आहे. 

जनतेला दिलेली आश्‍वासने कितपत पाळली जातात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. २३ तारखेला मुख्याधिकाऱ्यांकडे स्वीकृत व उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचे आहेत. दुपारी १ वाजता निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल. 

विकास आघाडीकडून स्वीकृत सदस्यपदासाठी एल. एन. शहा, विजय कुंभार यांच्या नावाला प्राधान्य दिले जाईल अशी चर्चा आहे.

उपनगराध्यक्षपदासाठी आग्रही असणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. नेमकी कुणाला संधी मिळते याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: dy. mayor selection