उपाध्यक्षपदी राजू भोसले की वसंत लेवे?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

‘स्वीकृत’साठी दत्तात्रय बनकर, धनश्री महाडिक, दत्ताजी थोरात आदी नावे चर्चेत
सातारा - नगराध्यक्षा माधवी कदम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर २७ रोजी सर्वसाधारण सभा बोलावण्याचे घोषित केल्याने आता उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्य निवडीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सातारा विकास आघाडीतून उपाध्यक्षपदासाठी राजू भोसले यांचे नाव आघाडीवर असून श्रीकांत आंबेकर, वसंत लेवे, यशोधन नारकर यांचीही नावे पुढे आली आहेत. तर, ‘साविआ’ला दोन, ‘नविआ’ व भाजपला प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य निवडता येणार असल्याने त्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा विकास आघाडीची एकहाती सत्ता आल्याने उपाध्यक्षपदासह समित्यांची सभापतिपदेही त्यांच्या गटातील नगरसेवकांना मिळणार आहेत. थेट जनतेतून विजयी झालेल्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाल पाच वर्षांसाठी असल्याने इतर इच्छुकांना सध्या उपाध्यक्षपदावर निभवावे लागणार आहे. त्यामुळे उपाध्यक्ष होण्यासाठी ‘साविआ’मध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. २७ रोजी उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्य निवडीची सभा असल्याने अवघ्या चार दिवसांत सर्व सूत्रे फिरणार आहेत. नगराध्यक्षपदी खुल्या प्रवर्गातील माधवी कदम विराजमान असल्याने सत्तेचा समतोल राखण्यासाठी ‘सोशल इंजिनिअरिंग’चाही प्रयोग राबविला जाण्याची शक्‍यता आहे. 

विशेषत: उदयनराजेंनी ‘ज्यांनी मदत केली, त्यांना संधी देणार आहे,’ असे अनेकदा सूतोवाच केल्याने ‘राज’कीय कारकिर्दीत मदतीचा ‘तारा’ बनलेल्या भोसले यांना संधी देण्याची शक्‍यता जास्त वर्तवली जात आहे. नगरसेवक राजू भोसले यांचे नाव सर्वाधिक चर्चेत राहिले आहे. त्याचबरोबर शहरातील सत्तेचा समतोल राखण्यासाठी यशोधन नारकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत ‘साविआ’तून विजयी झालेले वसंत लेवे यांना अनुभवाच्या ताकदीवर, तसेच ‘नविआ’ला सक्षमपणे प्रतिउत्तर देण्यासाठी उपाध्यक्षपद दिले जाण्याची शक्‍यता आहे. श्रीकांत आंबेकर, निशांत पाटील यांनीही प्रयत्न सुरू ठेवले आहेत. 

गोडोली प्रभागातील माजी उपनगराध्यक्ष, पक्षप्रतोद ॲड. दत्तात्रय बनकर यांचे नाव ‘साविआ’कडून स्वीकृत सदस्यासाठी अंतिम मानले जात आहे. नगराध्यक्ष लढतीतून माघार घेत ‘साविआ’ला पाठिंबा दिलेल्या काँग्रेसच्या धनश्री महाडिक यांचे नाव चर्चेत असले तरी ‘स्वीकृत’च्या नियमावलीची अडचण वाढली आहे. त्यामुळे इतर इच्छुकांनीही उदयनराजेंकडे प्रयत्न सुरू केले आहेत. नगर विकास आघाडीला एक पद मिळणार असून, त्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे नाव सुचवतील, तेच अंतिम होणार आहे. 

भाजपमधून दत्ताजी थोरात, किशोर गोडबोले, सुनील काळेकर, आप्पा कोरे, विठ्ठल बलशेटवार यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सुवर्णा पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांना ‘नविआ’, भाजपकडूनही ‘स्वीकृत’ची संधी देण्याचा शब्द दिल्याची चर्चा आहे.

मंगळवारी स्वीकृत सदस्य निवडीची सभा असल्याने पुन्हा शहरात राजकीय वातावरण तापले आहे. 

Web Title: dy. mayor selection in satara