घराणेशाहीला मतदारांचा दणका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

पीएन, आवाडे, संजय घाटगे, नाईक-निंबाळकरांनी गड राखला

कोल्हापूर - जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी घराणेशाहीला आणि वारसदारांना झिडकारल्याचे चित्र निवडणूक निकालावरून पुढे आले आहे. या निवडणुकीत साधारणपणे दहा वारसदार मतदारांपुढे आले होते; मात्र बहुतांशी वारसदारांना मतदारांनी स्वीकारले नाही. 

पीएन, आवाडे, संजय घाटगे, नाईक-निंबाळकरांनी गड राखला

कोल्हापूर - जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी घराणेशाहीला आणि वारसदारांना झिडकारल्याचे चित्र निवडणूक निकालावरून पुढे आले आहे. या निवडणुकीत साधारणपणे दहा वारसदार मतदारांपुढे आले होते; मात्र बहुतांशी वारसदारांना मतदारांनी स्वीकारले नाही. 

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांचे नातू व शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांचा मुलगा वीरेंद्र मंडलिक  रिंगणात होते. तेथे मंडलिक गटाचे कट्टर कार्यकर्ते भूषण पाटील इच्छुक होते, पण प्रा. मंडलिक यांनी त्यांना नाकारून आपला मुलगा वीरेंद्र याला रिंगणात उतरविले. त्यामुळे भूषण पाटील यांनी बंडखोरी केली. त्याचा फटका मंडलिक गटाला बसला. राजकारणात पदार्पण करणाऱ्या वीरेंद्र मंडलिक यांची अवस्था पहिल्या सामन्यातच रिकामे पॅव्हेलियनमध्ये परतल्यासारखी झाली. शित्तूर तर्फ वारुण जिल्हा परिषद मतदारसंघातून माजी खासदार कै. उदयसिंह गायकवाड यांचे नातू व मानसिंगराव गायकवाड यांचा मुलगा रणवीर गायकवाड यांना मतदारांनी नाकारले.

मानसिंगराव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे असताना स्थानिक राजकीय समीकरणामुळे त्यांनी रणवीरला शिवसेनेकडून रिंगणात उतरविले, पण त्यांनादेखील पराभवाला सामोरे जावे लागले.

गोकुळचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचा मुलगा संदीप नरके यांचे काही वर्षांपासून राजकीय प्रमोशन करण्याचा प्रयत्न सुरू होता. मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीचा मुहूर्त त्यासाठी नरकेंनी शोधला. कळे जिल्हा परिषद मतदासंघ त्यासाठी निवडला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अरुण नरके यांचे जिल्हा परिषदेत काँग्रेसला मत देण्याचे आवाहन शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील मतदारांना फारसे रुचलेले दिसत नाही. त्यांनी शिवसेनेच्या सर्जेराव पाटील या कार्यकर्त्याला मत दिले. त्यामुळे संदीप नरके यांना पराभवाला सामोरे जावे  लागले. याच निवडणुकीत नरके कुटुंबातील आणखी एक सदस्य कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातून उभे होते.

शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांचे भाऊ अजित नरके हे शिवसेनेकडून रिंगणात उतरले होते. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले होते. ते डोळ्यांसमोर ठेवून नरके मंडळी निवडणूक रिंगणात उतरली होती; पण मतदारांनी त्यांना नाकारले.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य धैर्यशील माने यांनी पत्नी वेदांतिका यांना रुकडी मतदारसंघातून  रिंगणात उतरविले होते. धैर्यशील माने यांचे संपूर्ण कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचे, पण या निवडणुकीत धैर्यशील माने यांनी भाजपसोबत स्थानिक पातळीवर आघाडी केली होती; पण वेदांतिका माने यांच्या पराभवावरून ही आघाडी मतदारांना रुचलेली दिसत नाही. माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य हिंदुराव चौगले यांनी आपली पत्नी रेखा यांना कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातून रिंगणात उतरविले होते, पण त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला.

विद्यमान सदस्य मंगल कलिकते यांचे पती संजय कलिकते कौलव मतदारसंघातून निवडणूक लढवत होते, मात्र त्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. विद्यमान सदस्य प्रकाश पाटील यांनी भावजय समृद्धी पाटील यांना रिंगणात उतरविले होते. त्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले.  शिक्षण समिती सभापती अभिजित तायशेटे यांनी आपला मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर पत्नी आरती यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. तेथे त्यांना पराभवाला  सामोर जावे लागले. गोपाळ पाटील यांचा मुलगा विशाल पाटील, माजी सदस्य सुरेश बटकडली यांचा मुलगा संजय बटकडली, माजी आमदार कै. नरसिंग गुरुनाथ पाटील यांचा मुलगा व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. माजी मंत्री भरमू सुबराव पाटील यांच्या सून व विद्यमान महिला, बालकल्याण समिती सभापती ज्योती पाटील यांनाही मतदांरानी नाकारले आहे. गोकुळचे संचालक पी. डी. धुंदरे यांचा मुलगा सागर धुंदरे यांनाही मतदारांनी नाकारले आहे.

ही नेत्यांची मुले जिंकली 
माजी आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचा मुलगा राहुल, माजी आमदार प्रकाश आवाडे यांचा मुलगा राहुल, माजी आमदार संजय घाटगे यांचा मुलगा अंबरिश घाटगे, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांचे राजकीय वारसदार राजवर्धन यांना मतदारांनी मात्र स्वीकारले आहे.

Web Title: Dynastic voters bump