सोलापूर: ई लिलावाविरुद्ध गाळेधारकांचा 'एल्गार'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

असे होईल टप्प्याटप्प्याने आंदोलन 
- 5 जुलै : महापालिकेसमोर धरणे आंदोलन 
- 9 जुलै : पारस इस्टेटपासून महापालिकेवर मोर्चा 
- 12 जुलै : सोलापूर बंदची हाक

सोलापूर : महापालिकेचे मेजर व मिनी गाळ्यांचा ई लिलाव करण्याच्या निर्णयाविरुद्ध गाळेधारकांनी एल्गार पुकारला आहे. विरोधासाठी तीन टप्प्यांत आंदोलन करण्याची घोषणा माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली. 12 जुलैला सोलापूर बंद करण्याची घोषणाही त्यांनी केली. 

महापालिका मेजर व मिनी गाळेधारक व्यापारी संघर्ष समितीच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या मेळाव्यात श्री. आडम बोलत होते. व्यासपीठावर नगरसेवक आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे, तौफिक शेख, रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, प्रकाश वाले, अमोल शिंदे, राजकुमार हंचाटे, माजी महापौर मनोहर सपाटे, नगरसेविका कामिनी आडम, ज्योती बमगुंडे, समितीचे अध्यक्ष अशोक मुळीक यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. 

ई लिलाव झाला तर सोलापुरातील प्रस्थापित झालेला व्यवसाय अडचणीत येणार आहे. किरकोळ व्यापारी रस्त्यावर येतील. त्यामुळे कोणत्याही स्थितीत गाळ्यांचा ई लिलाव होऊ देणार नाही. जे व्यापारी ई लिलावात सहभागी होणार आहेत, त्यांनाही परावृत्त करण्यात येईल. निविदा आणि कोटेशन पद्धतीनेही गाळ्यांचा लिलाव होऊ नये, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज असल्याचे अध्यक्ष मुळीक यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले. 

तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनीही ई लिलाव प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांच्या विरोधात मोर्चा काढत ई लिलावला विरोध दर्शविला होता. आता तेच पालकमंत्री आयुक्तांच्या माध्यमातून ही पद्धत व्यापाऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. ई लिलावाचा निर्णय व्यापाऱ्यांवर लादला तर त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला. देवीदास गायकवाड, दीपक मुनोत, मोहन बारड आणि केतन शहा या व्यावसायिकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. राजकीय हेतूने प्रेरित होऊन व्यापाऱ्यांना कुणीही पाठिंबा देऊ नये, असे आवाहन तौफिक शेख यांनी केले. तर "अच्छे दिनच्या घोषणेला भुलून पाठिंबा दिला, निवडून दिले आणि आता बोंबलत बसण्याची वेळ आली आहे', अशी टीका केतन शहा यांनी केली. या मेळाव्यादरम्यान व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी नवी पेठ पूर्णपणे बंद होती. 

असे होईल टप्प्याटप्प्याने आंदोलन 
- 5 जुलै : महापालिकेसमोर धरणे आंदोलन 
- 9 जुलै : पारस इस्टेटपासून महापालिकेवर मोर्चा 
- 12 जुलै : सोलापूर बंदची हाक

Web Title: e auction for shops in Solapur