esakal | बेळगावात ई-वेस्टचा प्रश्न बनतोय गंभीर; का ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

 e waste activity ignored by people and also municipal corporation of belguam

लोकांकडून प्रतिसाद बंद झाल्याने हा चांगला उपक्रमही बंद पडला आहे

बेळगावात ई-वेस्टचा प्रश्न बनतोय गंभीर; का ते वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : महापालिकेने डिसेंबरमध्ये सुरू केलेल्या ई-कचरा व ढिगारे (डेब्रिज) संकलन केंद्राला प्रतिसाद मिळालेला नाही. ई-कचरा जमा करण्यासाठी एक वाहनही तैनात केले होते; तर ढिगाऱ्यांची उचल करून ते निर्धारित केलेल्या जागेत टाकण्यासाठी वाहनचालकांना नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. पण, महापालिकेकडे ढिगारे वाहून नेण्यासाठी अद्याप वाहनांची नोंद झालेली नाही. ई-वेस्ट केंद्र सुरू केल्यावर प्रारंभी काही दिवस लोकांकडून प्रतिसाद मिळाला. पण, नंतर प्रतिसाद बंद झाल्याने हा चांगला उपक्रमही बंद पडला आहे.

हेही वाचा - बेळगावात दिसणार आता फेट्यातल्या गणेशमूर्ती...

शहरात ढिगाऱ्यांची मोठी समस्या आहे. जुन्या घराचे साहित्य, माती, विटा रस्त्यावरच टाकल्या जात असल्याने वाहतुकीला अडचण निर्माण होते. त्यामुळे, महापालिकेने श्रीनगरमध्ये एक खुली जागा ढिगारे साठविण्यासाठी राखीव ठेवली आहे. शहरातील ढिगाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी वाहनांची नोंदणी करण्यात येणार होती. नोंदणीकृत वाहनांमधूनच ढिगाऱ्यांची वाहतूक करण्याचे महापालिकेने जाहीर केले होते. ढिगारे असतील तर आरोग्य विभागाशी संपर्क साधून नोंदणीकृत वाहनमालकांचा संपर्क क्रमांक घेण्याचे आवाहनही केले होते.

रस्त्यावर ढिगारे टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पण, महापालिकेकडे अद्याप वाहनमालकांनी नोंदणीही केली नाही. शिवाय ढिगारेही अजून रस्त्यावरच टाकले जात आहेत. आयुक्त जगदीश यांनी २५ डिसेंबरला स्वतः खासबागमध्ये ई-कचरा तर श्रीनगरमध्ये ढिगारे संकलन केंद्र सुरू केले होते. दोन्ही केंद्रांसाठी हेल्पलाईन सुरू केली होती. ई-कचरा किंवा ढिगारे कचऱ्यात मिसळल्यामुळे सफाई कामगार जखमी होत होते. 

हेही वाचा -  ऑनलाईन शिक्षणावर भिस्त नको; नव्या कल्पना सूचवा... 

स्वच्छ सर्वेक्षण किंवा स्वच्छ भारत अभियानात या दोन्ही केंद्रांची सक्ती असल्याने महापालिकेने तातडीने या दोन्ही केंद्रांची सुरवात केली. पण, लोकांना ई-कचरा किंवा ढिगाऱ्यांबाबत गांभिर्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जानेवारीत काही लोकांनी महापालिकेशी संपर्क साधून ई-कचरा दिला. पण त्यानंतर प्रतिसाद बंद झाला. ढिगाऱ्यांसाठी राखीव ठेवलेली जागा अजूनही खुलीच आहे.

"कोरोना काळात ई-वेस्ट व ढिगारे या दोन्हीबाबत महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर याबाबत पाठपुरावा केला जाईल."

- डॉ. बसवराज धबाडी, आरोग्याधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top