प्रत्येक तालुक्‍यात वेगळी आघाडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्‍यात स्वतंत्र आघाडी करण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून त्या त्या तालुक्‍यातील नेत्यांनी स्वतःचा लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीचा पाया रचण्यास सुरवात केली आहे. राज्याप्रमाणे जिल्ह्यातही शिवसेना व भाजपची ताटातूट निश्‍चित असल्याने या दोन्ही पक्षांना कुठे कॉंग्रेससोबत तर कुठे राष्ट्रवादी, ताराराणी आघाडीशी हातमिळवणी करण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्‍यात स्वतंत्र आघाडी करण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून त्या त्या तालुक्‍यातील नेत्यांनी स्वतःचा लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीचा पाया रचण्यास सुरवात केली आहे. राज्याप्रमाणे जिल्ह्यातही शिवसेना व भाजपची ताटातूट निश्‍चित असल्याने या दोन्ही पक्षांना कुठे कॉंग्रेससोबत तर कुठे राष्ट्रवादी, ताराराणी आघाडीशी हातमिळवणी करण्याची वेळ आली आहे.

जातीयवादी पक्षांशी कदापि युती नाही, पुरोगामी विचारांचा वारसा जपणारा आमचा पक्ष आहे, हे भाषणात सांगणाऱ्या नेत्यांनीही या विचारांना या निवडणुकीत तिलांजली दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून पक्षनेतृत्वाचा कार्यकर्ते असो किंवा त्या त्या तालुक्‍यातील नेत्यांवर धाकच राहिला नसल्याचे दिसून येते. या आघाड्याच जिल्ह्याच्या पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट करतील, असे चित्र आहे.

कॉंग्रेसने नैसर्गिक मित्र राष्ट्रवादीसोबत दक्षिणसह अन्य काही मतदारसंघांत आघाडीचे संकेत दिले असले तरी राष्ट्रवादीने मात्र कागलात शिवसेनेशी, हातकणंगलेत भाजप व त्याच्या मित्रपक्षांशी हातमिळवणी सुरू केली आहे.

हातकणंगले तालुक्‍यात कॉंग्रेसने शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेण्याचे संकेत दिले आहेत. चंदगड विधानसभेच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी भाजपत प्रवेश केलेल्या गोपाळराव पाटील यांच्याशी जमवून घेऊन विधानसभेतील आपली ताकद कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. कुपेकर यांच्या या भूमिकेमुळे तालुक्‍यातील (कै.) नरसिंगराव पाटील व भरमू पाटील गट कॉंग्रेससोबत राहील, अशी शक्‍यता आहे.

करवीर विधानसभेत कॉंग्रेस व राष्ट्रवादीही स्वतंत्र लढतील; मात्र कॉंग्रेसचे जनसुराज्यसोबत जुळवून घेण्याची चर्चा सुरू आहे. त्यात शेकापलाही सामावून घ्यावे, असाही विचार सुरू आहे. पन्हाळा, शाहूवाडीत कॉंग्रेसची ताकद फारशी नाही. त्या ठिकाणी "जनसुराज्य', "स्वाभिमानी'शी स्थानिक आघाडीच्या नावाने आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत.

राधानगरीत कॉंग्रेस इच्छुकांची संख्या मोठी असली तरी त्या ठिकाणीही राष्ट्रवादीला सोबत घ्यायचे की "स्वाभिमानी'ला, असे धर्मसंकट नेत्यांसमोर आहे. या तालुक्‍यात दोन्ही कॉंग्रेसची ताकद चांगली आहे.

दृष्टिक्षेपात तालुकानिहाय सद्यःस्थिती
हातकणंगले - आवाडे विरोधात आवळे, महाडिक यांची मोट, त्याला आवाडे यांच्याकडून शिवसेना, स्वाभिमानीशी जुळवून घेऊन प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न.
करवीर - कॉंग्रेसला शह देण्यासाठी राष्ट्रवादीची रणनीती, कॉंग्रेसचे जनसुराज्य, स्वाभिमानीशी युती करण्याचे प्रयत्न.
कोल्हापूर दक्षिण - कॉंग्रेस-राष्ट्रवादीविरोधात भाजप-ताराराणी, शिवसेना असे चित्र.
पन्हाळा - कॉंग्रेस व राष्ट्रवादीचेही "जनसुराज्य'कडे साकडे.
शाहूवाडी - राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र तर जनसुराज्य व कॉंग्रेसप्रणित स्थानिक आघाडीत चर्चा.
आजरा - राष्ट्रवादी, कॉंग्रेस स्वबळावर तर भाजप, ताराराणीची मदार दोन्ही कॉंग्रेसमधील नाराजांवर.
गडहिंग्लज - राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकमेकांविरोधात शक्‍य, विरोधात भाजप आघाडी.
चंदगड - कुपेकर-भाजपत आघाडी, कॉंग्रेसची नरसिंगराव, भरमू गटासोबत युती.
राधानगरी - कॉंग्रेसचे स्वाभिमानीशी मिळतेजुळते घेण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादी स्वबळावर.
गगनबावडा - कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाजप आघाडीही स्वतंत्रच.
कागल - राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी शक्‍य, विरोधात भाजप आघाडी. कॉंग्रेसकडे उमेदवारांची वानवा.
भुदरगड - शिवसेना विकास आघाडीत, राष्ट्रवादी, कॉंग्रेसची आघाडी शक्‍य, भाजप स्वतंत्र.
शिरोळ - स्वाभिमानीच्या विरोधात शिवसेना, भाजप-माने गट अशी आघाडी होण्याचे संकेत.

Web Title: Each district different lead