अबब ! खाद्यतेलाच्या दराने ओलांडली शंभरी; काय आहेत कारणे ?

Edible Oil Rate Above Hundred Sangli Marathi News
Edible Oil Rate Above Hundred Sangli Marathi News

सांगली - कांदा-लसणाचे दर वाजत-गाजत गगनाला भिडलेले असताना खाद्यतेलाच्या दरानेही गेल्या दहा दिवसांत मुसंडी मारली आहे. खाद्यतेलाचे दर पहिल्यांदाच शंभर रुपयांवर गेले आहेत. मलेशिया सरकारने पाम निर्यातीविषयी धोरणात केलेले बदल, निर्यातीवर लादलेला अतिरिक्त कर आणि भारतातील बड्या व्यापाऱ्यांनी केलेली अनिर्बंध साठेबाजी याचा एकत्रित फटका बसल्याने ही दरवाढ झाल्याचे तेल व्यापाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

भारत खाद्यतेलासाठी ७० टक्के आयातीवर अवलंबून आहे. मलेशियातून सर्वाधिक आयात केली जाते. भारतात पामचे खाद्यतेलातील मिश्रण हे सरासरी २० टक्केपर्यंत ग्राह्य आहे. त्यामुळे मलेशियातून आयात होणारे खाद्यतेल आणि पाम या दोन्ही पातळीवर भारताची कोंडी झाली आहे. पामच्या निर्यातीवर मलेशिया सरकारने नियंत्रण आणले असून निर्यात दरातही वाढ केली आहे. त्यामुळे तेलाच्या दरात एकाएकी मोठी वाढ झाली आहे, असे वसंतदादा मार्केट यार्डमधील घाऊक तेल व्यापारी विशाल जगदाळे यांनी सांगितले. 

सांगलीत रोज ९० टनावर आवक

एकट्या सांगली जिल्ह्यात दररोज सुमारे ९० ते ९५ टन खाद्यतेलाची आवक होते. गेल्या पंधरा दिवसांत सरासरी १० रुपयांनी तेलाचे दर वाढले आहेत. त्या हिशेबाने सांगलीकरांच्या किचेन बजेटमध्ये दररोज दहा लाख रुपयांची वाढ झाली आहे. स्थानिक पातळीवर तेल निर्मितीचे प्रमाण नगण्य आहे. आयात तेलाचे आपापल्या ब्रॅंडमध्ये पॅकिंग करून ते बाजारात आणले जाते. घाऊक बाजारात टॅंकरने आलेल्या तेलाची विक्री ९१ रुपये प्रतीकिलो होत आहे. ते किरकोळ बाजारात स्थानिक ब्रॅंड १०० रुपये आणि मोठे ब्रॅंड १०५ रुपये किलोने विकत आहेत. 
या साऱ्याचा मोठा परिणाम शेंगतेलावरही झाली असून तो ११५ रुपये किलोवर पोहोचले असल्याचे किराणा व्यापारी मारुती बेलकर यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘गेल्या आठवड्यात खाद्यतेल ९० ते ९५ रुपये होते. एकाएकी १०० ते १०५ रुपयांवर पोहोचले आहेत. दरवाढ झाल्याने ग्राहकांनाही झटका बसतोय.’’ 

वायदे बाजार चढाच

जानेवारीत वायदे बाजारात घाऊक बाजारातील खाद्यतेलाचे दर सुमारे १११ रुपये दिसत असल्याचे विशाल जगदाळे यांनी सांगितले. त्यामुळे जानेवारीत खाद्यतेलाचे दर आणखी पेटणार हे स्पष्ट आहे. ते १२० रुपये होऊ शकतील किंवा त्याहून अधिक. मार्चपर्यंत ही स्थिती राहील, असा अंदाज आहे. त्याआधी केंद्र सरकार त्यात काही हालचाली करेल का, याकडेही व्यापाऱ्यांचे लक्ष आहे. 

असे आहेत दर...

सूर्यफूल ः १०० रुपये (ब्रॅंड ः १०५) 
सरकी ः १०० रुपये (ब्रॅंड ः १०५)
शेंगतेल ः ११५ रुपये 

भाववाढीने झटका

खाद्यतेलाचे दर शंभर रुपये पार करून गेल्याचा धक्काच बसला. तेल नित्य गरजेची आहे आणि त्याचीच भाववाढ झाली आहे. दर वाढून स्थिर झालेला नाही तर तो वाढतच राहणार असेल तर गृहिणींसाठी ही काळजीची बाब असेल. किचन बजेटसाठी कांद्यानंतर हा मोठा झटका आहे.
- शाल्मली वझे, सांगली
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com