गोसावी समाज बदलतोय, 'स्कुल चले हम' म्हणतोय..

अर्चना बनगे
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्र ,कर्नाटक, गोवा या राज्यात गोसावी समाजाच्या सर्वाधिक वसाहती आहेत. हा समाज अठरा जातीमध्ये विखुरला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करणारा, असा हा समाज आहे.

कोल्हापूर - आम्ही आता शाळेला जाणार, आम्हाला शिकायचा आहे, पुढे यायचा आहे असं म्हणत गोसावी समाजातील तरुण पिढी आता समाजाच्या प्रवाहात येत आहे. गेल्या चार वर्षापासून या समाजाने बदल करत मुलींना शिक्षण आणि अठरा वर्षाच्या पुढे  मुलींचे लग्न हा निर्णय घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे .

गोसावी समाज हा तसा सुरवातीपासूनच शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होता. भंगार गोळा करणे, प्लास्टिकच्या वस्तू गोळा करणे, तसेच टिकली, फनी, कंगवा, कानातले डूल वेगवेगळ्या प्रकारच्या चाफा भरलेली बकेट डोक्यावर घेऊन गावभर फिरून, विक्री करून आपला उदरनिर्वाह करणारा हा समाज. या कष्टाच्या कामामुळे मुलीला घरात न ठेवता तिला लहान वयातच लग्नाच्या बंधनात अडकून तिला तिच्या घरी पाठवणे ही रीत भात या समाजामध्ये अगदी पूर्वीपासूनची होती. मात्र आता काळानुरूप त्यांनी बदल स्वीकारला आहे.

महाराष्ट्र ,कर्नाटक, गोवा या राज्यात गोसावी समाजाच्या सर्वाधिक वसाहती आहेत. हा समाज अठरा जातीमध्ये विखुरला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करणारा, असा हा समाज आहे. आपल्याप्रमाणेच आपली मुलेही याच व्यवसायात गुंतू नयेत अशी त्यांची माणसिकता आहे. त्यामुळेच शिक्षण आणि योग्य वयात लग्न हा विचार त्यांच्या मनात पक्का होऊ लागला आहे. हळूहळू या भटकंतीला कुठेतरी फाटा देत आता शिक्षणाची कास धरण्याचा आणि मुलीचे वय अठरा वर्षे तर मुलाचे वय एकविस वर्षे पूर्ण झाल्यानंतरच लग्न करण्याचा निर्णय या समाजाने घेतला आहे. याला या समाजातील महिलांनीही पाठींबा दिला आहे. 

आमचे वय चाैदा वर्षे असताना आमचे लग्न झाले. शिक्षण काय असतं, हे आम्हाला माहीत नाही. पाठीवरती अक्षर गिरवणे म्हणजे काय आहे हे आम्हाला माहीतच नाही. पण आता आमच्या भावांना, मुलांना, मुलींना आम्ही शिकवून चांगले संस्कार देणार आहोत. भंगार गोळा करणारे, चाफा विकणारे असे चित्र बदलून आम्ही चांगल्या संस्कारांनी या मुलांना समाजामध्ये उतरण्याचा प्रयत्न करणार आहोत अशी भावना गोसावी समाजातील माता - भगिनी व्यक्त केली.

आम्हाला परिस्थितीमुळे शिकता आले नाही, पण आम्ही आता आमच्या पुढच्या पिढीसाठी शिक्षण आणि मुलीचे योग्य वयात लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
- रघुनाथ गोसावी,
 नागरिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Education Brings Development In Gosavi Community