बेळगावात शिक्षण खात्यानेच केली शाळा सुधारणेसाठी देणगीदार शोधण्याची सुचना

मिलिंद देसाई
Monday, 30 November 2020

लोंकाशी संपर्क साधुन शाळेचा विकास करुन घ्यावा तसेच देणागीदार मिळविण्यासाठी मुख्याध्यापकांनी शाळा सुधारणा कमिटीशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे. 

बेळगाव : कोरोनाचे संकट असतानाही सरकारी शाळांमध्ये 20 टक्‍कांनी विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे समाधान व्यक्‍त केले जात आहे. मात्र यावेळी कोरोनाचे संकट असल्याचे कारण पुढे करीत शाळांच्या, दुरुस्तीसाठी अनुदान मंजुर करण्यात आलेले नसुन शाळांच्या विकासासाठी देणगीदार शोधा अशी सुचना शिक्षण खात्याने केली आहे. त्यामुळे शिक्षकांमधुन आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

शिक्षण खात्याने शाळा सुरु होण्यापुर्वी रंगकाम पुर्ण करा अशी सुचना शाळांना केली होती. मात्र शाळांना रंगकाम करण्यासाठी मोठ्‌या प्रमाणात खर्च येतो यासाठी अनुदान कोण देणार ? असा प्रश्‍न शिक्षकांमधुन व्यक्‍त होत आहे. मात्र कोरोनामुळे सरकार संकटात असल्याने अनुदान देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शिक्षण खात्याने परिसरातील संघ, संस्था, पालक, देणगीदार किंवा इतर लोंकाशी संपर्क साधुन शाळेचा विकास करुन घ्यावा तसेच देणागीदार मिळविण्यासाठी मुख्याध्यापकांनी शाळा सुधारणा कमिटीशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे. 

हेही वाचा - आधी परवानगी घ्या, मगच ‘शुभमंगल’ म्हणा ! ; प्रशासनाचा निर्णय -

बेळगाव जिल्ह्यात सरकारी शाळांची संख्या मोठ्‌या प्रमाणात असुन सरकारी शाळांमध्ये सरासरी 2 ते 8 इतक्‍या शाळा आहेत. 8 वर्ग खोल्यांना रंगकाम करायचे असल्यास 80 ते 90 रुपयांची आवश्‍यकता असते. रंगकाम करण्यासाठी कर्मचारी व इतर खर्च मिळुन 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. त्यामुळे इतकी मोठी रक्‍कम कशी जमा करावी असा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे. गेल्या वर्षी सरकारने शाळांच्या दुरुस्तीसाठी अनुदान दिले, मात्र यावेळी अनुदान दिलेले नाही.

महाविद्यालयांमध्ये वर्ग खोली व इतर बांधकामांसाठी 17 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. शाळांसाठी हे अनुदान 6 लाख रुपयांचे असते. मात्र कमी अनुदानामुळे बांधकाम करता येत परिणामी काही दिवसातच शाळांच्या स्लॅबमध्ये पाणी गळती होणे, भितींना तडे जाणे असे प्रकार घडतात. यामुळे बांधकामासाठी अधिक प्रमाणात अनुदान देणे आवश्‍यक असल्याचे मत शिक्षकांमधुन व्यक्‍त होत आहे. 

दरवर्षी शाळेला रंगकाम करण्याची आवश्‍यकता नसते त्यामुळे पाच ते सहा वर्षातुन शाळेला रंगकाम करुन घेतले जाते. मात्र कोरोनामुळे अनेक दिवस शाळा बंद असल्याने काही शाळांच्या भिंतीवर विविध प्रकारची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. तसेच अश्‍लिल मजुकरही लिहीण्यात आला आहे. अशा अनेक शाळांमध्ये रंगकाम करणे गरजेचे बनले असुन रंगकाम करण्यासाठी देणगी जमा करण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.

हेही वाचा -  बहिणीचा आशीर्वाद पाठीशी म्हणून वाचला भावाचा जीव -

"कोरोनामुळे यावेळी कोणत्याही प्रकारचे अनुदान देण्यात आलेले नाही त्यामुळेच शाळांच्या सुधारणेसाठी इतर लोकांची मदत घ्या अशी सूचना करण्यात आली आहे."

- ए बी पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी
 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education department decision to find donor for a school in belgaum