स्फोट करून उडविल्या आठ बोटी

संजय काटे
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

श्रीगोंदे तालुक्‍यात भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर केला जातो. येथे वाळू उपसा करणाऱ्या टोळ्याच कार्यरत असून, त्यांचा व्यवसाय राजरोस सुरू आहे. पाण्याने भरलेल्या नदी पात्रातून तळाशी असलेली वाळू उपसून घेण्यासाठी आधुनिक यंत्राणे सज्ज असलेल्या बोटींचा वापर केला जातो.

श्रीगोंदे (नगर): श्रीगोंद्याच्या हद्दीतील आर्वी, अजनुज व पेडगाव येथे भीमा पात्रात वाळू उपसा करीत असलेल्या आठ बोटी महसूल व पोलिस यंत्रणेच्या संयुक्त पथकाने स्फोट करून उडवून दिल्या. त्यामुळे सुमारे चाळीस लाखांचा मुद्देमाल नष्ट करून वाळू चोरांना प्रशासनाने चपराक दिली.

श्रीगोंदे तालुक्‍यात भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर केला जातो. येथे वाळू उपसा करणाऱ्या टोळ्याच कार्यरत असून, त्यांचा व्यवसाय राजरोस सुरू आहे. पाण्याने भरलेल्या नदी पात्रातून तळाशी असलेली वाळू उपसून घेण्यासाठी आधुनिक यंत्राणे सज्ज असलेल्या बोटींचा वापर केला जातो. या बोटी रात्रीच्या अंधारातही हे काम करतात. या वाळू उपशाला प्रतिबंध घालण्यासाठी महसूल व पोलिस अधून मधून छापे घालून कारवाई करतात. मात्र, काही दिवसांनी पुन्हा वाळू उपसा सुरू होतो. जप्त केलेली वाहने पळवून आणली जातात. या वाळू चोरीच्या व्यवसायात अनेकांचे हात गुंतले असून, त्यातून दादागिरी वाढली आहे. गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे.

पोलिस व महसुलचे अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने वाळू चोरांचे फावले आहे. त्यांनी पुन्हा वाळू उपसा सुरू केला आहे.
या वाळू उपशाची माहिती मिळताच तहसिलदार महेंद्र माळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज दुपारी अचानक अजनुज, आर्वी व पेडगाव शिवारात छापा टाकला. या शिवारात मोठ्या प्रमाणात बोटीद्वारे वाळू उपसा सुरू होता. हे पथक आल्याचे पाहाताच वाळू तस्करी करणारांची धांदल उडाली त्यांनी बोटीवरून उड्यामरून तेथून पलायन केले. त्यांनी तेथे सोडून दिलेल्या बोटी या पथकाने जप्त केल्या. वाळू तस्करांनी पुन्हा या बोटींचा वापर करू नये यासाठी स्फोटकांचा वापर करुन आठ बोटी नष्ट करण्यात आल्या. या बोटींची व त्यावरील यंत्रांची किमत सुमारे 40 लाख ऐवढी आहे.

निवडणूक यंत्रणेत गुंतलेली महसूल व पोलिसांची पथके आता कारवाईसाठी सरसावले आहेत.
या कारवाईत तहसीलदार माळी यांच्यासोबत मंडळ अधिकारी प्रशांत सोनवणे, आजबे, सतीश घोडेकर पोलिस कर्मचारी दादा टाके, उत्तम राऊत, प्रताप देवकाते, किरण बोराडे आदी सहभागी झाले होते.

भीमा पात्रात आज केलेल्या कारवाईत वाळू चोरांचे सुमारे 40 लाख रुपयांचे नुकसान झाले. यापुढे अशा वाळू चोरीबद्दल माहिती मिळाल्यानंतर तातडीने कारवाई करून सापडलेली बोट स्फोट करून उडवली जाईल. नदी पात्रात होणाऱ्या वाळू उपशा बद्दल नागरिकांनी जागरूकपणे प्रशासनाला माहिती दिल्यास तातडीने कारवाई केली जाईल.

महेंद्र माळी,तहसिलदार, श्रीगोंदे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight boats exploded