नगर तालुक्‍यात आठ हजार "क्‍वारंटाईन' 

Eight thousand "quarantine" in Ahmednagar taluka
Eight thousand "quarantine" in Ahmednagar taluka

नगर तालुका : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परदेशांतून आलेल्या तालुक्‍यातील 37 नागरिकांवर आरोग्य विभागाचा "वॉच' आहेच; शिवाय जिल्ह्याबाहेरून आलेले आठ हजार व राज्याबाहेरून आलेल्या 295 लोकांनाही "क्वारंटाईन' केले आहे. चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात 30 बेडची व्यवस्था केली आहे. शहरातून येणाऱ्यांची संख्या अजूनही वाढतच आहे.

पुण्या-मुंबईसह अन्य शहरांतून येणाऱ्या पाहुण्यांवर आरोग्य यंत्रणेचे विशेष लक्ष आहे. तालुक्‍यातील अशा आठ हजार 369 पाहुण्यांना शोधून काढून त्यांच्या हातांवर "होम क्वारंटाईन'चे शिक्के मारण्यात आले आहेत. नगर तालुक्‍यातील सुमारे 25 हजारांहून अधिक लोकांनी नोकरी- व्यवसायानिमित्त गाव सोडून शहर गाठले. देशात "लॉक डाऊन' झाल्यावर या स्थलांतरित लोकांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा गावाकडे वळविला. 

शहरातून गावात येणाऱ्या या लोकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा पाहुण्यांवर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांच्या माध्यमातून आरोग्य विभागाने गावोगावी पाहुण्यांची शोधमोहीम राबविली. त्यांची बारीक-सारीक माहिती घेतली. शिवाय, त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसतात का, याचेही निरीक्षण केले. संशयास्पद आढळून आल्यास संबंधितांना जवळच्या आरोग्य केंद्रांत पाठविले. उर्वरित लोकांच्या हातांवर "होम क्वारंटाईन'चा शिक्का मारून त्यांना 14 दिवस इतरांपासून वेगळे राहण्याचा सल्ला दिला. गावात नव्याने येणाऱ्यांवर "वॉच' ठेवण्यासाठी यंत्रणा सतर्क आहे. 

नगर तालुक्‍यात सर्व्हेचे काम बहुतांश झाले आहे. मात्र, गावात काही जण लपूनछपून येत आहेत. त्यामुळे या लोकांचा आकडा वाढत आहे. आतापर्यंत आठ हजार 637 पैकी आठ हजार 369 जणांच्या हातांवर "क्वारंटाईन'चे शिक्के मारले आहेत. चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयात 30 बेडची व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास तालुक्‍यातील काही हॉस्पिटल ताब्यात घेण्यात येतील. 
- ज्योती गाडे, तालुका आरोग्य अधिकारी 


नगर तालुक्‍याची स्थिती 

तालुक्‍याबाहेरील - 253 
जिल्ह्याबाहेरील - 8052 
राज्याबाहेरील - 295 
विदेशातून आलेले- 37 
एकूण - 8637 
शिक्के मारलेले - 8369 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com