आठ हजार कामगारांना मिळाले काम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

तालुक्‍यातील 8 हजारांहून अधिक रोहयो कामगारांच्या हातांना काम उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या त्यांच्याकडून नाल्यातील गाळ काढणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटारी खोदणे अशी कामे सुरू आहेत.

बेळगाव - तालुक्‍यातील 8 हजारांहून अधिक रोहयो कामगारांच्या हातांना काम उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या त्यांच्याकडून नाल्यातील गाळ काढणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटारी खोदणे अशी कामे सुरू आहेत. उर्वरित कामगारांनाही लवकरात लवकर काम देण्याचे नियोजन अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. 

हे पण वाचा -Valentine Day Special - मेरा दिल खोले तो, तेरा दिल नजर आयेगा....

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी नाल्याचे बांध फुटल्याने शिवारात पाणी जाण्यासह गाळही आल्यामुळे पिके गाडली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले. तर अनेक सार्वजनिक तलावही गाळाने भरले आहेत. मार्कंडेय नदीतही पुन्हा गाळ साचला असून रोहयोतून टप्प्याटप्प्याने गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक रोहयो कामगाराला शंभर दिवस काम देण्याचे नियोजन शासनाकडून करण्यात आले आहे. बेळगाव तालुक्‍यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या रोहयो कामगारांना काम उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित पीडीओंना देण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात 2 हजार रोहयो कामगारांना काम उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यांकडून ठेवण्यात आले होते. त्यानुसार ज्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात काम आहे, तेथील रोहयो कामगारांना काम उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

हे पण वाचा - बाळासाहेब थोरात म्हणाले..मला काय विचारता, मी पाहुणा 

तालुक्‍यात 8 हजारहून अधिक रोहयो कामगारांनी काम उपलब्ध करून देण्याची मागणी संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यानुसार त्यांना कामे उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच यापुढेही कामगारांनी काम देण्याबाबतचा अर्ज दाखल केल्यास, त्यांना काम देण्याचे प्रयत्न अधिकाऱ्यांकडून केले जाणार आहेत. सध्या तलाव आणि मार्कंडेय नदीमध्ये पाणी असल्यामुळे तेथील गाळ काढण्याचे काम मे महिन्यात करण्यात येणार आहे. सध्या वनखात्याकडून काम उपलब्ध करून देण्यात आले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच गटारीसाठीही खोदकाम केले जात आहे. 

ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल केलेल्या रोहयो कामगारांना काम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आतापर्यंत मागणी केलेल्या 8 हजार हून अधिक रोहयो कामगारांना काम देण्यात आले आहे. यापुढेही मागणीनुसार कामगारांना काम उपलब्ध करून दिले जाईल. 

-एम. के. कलदगी, कार्यकारी अधिकारी, तालुका पंचायत 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight thousand workers got their work