कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनवर एकता पॅनेलचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

एक  नजर

  • कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी मदन पाटील गटाच्या एकता पॅनेलची एकहाती सत्ता
  • विरोधी स्वाभिमानी रिटेल पॅनेलचे प्रमुख महेश सावंत यांच्यासह चार माजी संचालकांचा पराभव 
  • सात तास चालली मतमोजणी प्रक्रिया

कोल्हापूर - शेवटपर्यंत उत्कंठा लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी मदन पाटील गटाच्या एकता पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता अबाधित राखत विरोधकांचा धुव्वा उडविला. विरोधी स्वाभिमानी रिटेल पॅनेलचे प्रमुख महेश सावंत यांच्यासह चार माजी संचालकांना पराभवाचा सामना करावा लागला. जवळपास सात तास चाललेली मतमोजणी प्रक्रिया रात्री एकला संपली.

कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या २९ जागांसाठी दोन पॅनेलमधून ५८ व अपक्ष तीन असे ६१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मदन पाटील, संजय शेटे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी एकता पॅनेल व महेश सावंत, सुरेश काटकर, रंगराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी रिटेल पॅनेल यांच्यात दुरंगी लढत होती.

गेल्या महिनाभरापासून दोन्ही पॅनेलकडून सुरू असलेल्या प्रचारामुळे ही निवडणूक चुरशीची झाली होती. दोन्ही पॅनेलच्या प्रमुखांसह उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी जिल्हाभरात फिरून प्रचार केला होता. सत्ताधारी पॅनेल आपली सत्ता अबाधित राहणार की मतदार स्वाभिमानी रिटेल पॅनलला पसंती देणार, याकडे केमिस्ट असोसिएशनच्या मतदारांचे लक्ष लागून राहिले होते.

मतदान प्रक्रियेला सकाळी नऊला दसरा चौकातील शहाजी छत्रपती महाविद्यालयात सुरवात झाली. सायंकाळी पाचपर्यंत दोन हजार ३०३ मतदारांपैकी दोन हजार २४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी सहाला मतमोजणीला सुरवात झाली.

प्रारंभी भुदरगड, शाहूवाडी, चंदगड, आजरा येथील मतमोजणी झाली. आता सत्तारूढ पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळविला. मतमोजणीचा कल सत्तारूढ पॅनेलच्या बाजूने झुकत असल्याचे स्पष्ट होताच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलालाच्या उधळणीला सुरवात केली. यानंतर अन्य विभागातील मतमोजणीचा कलही सत्ताधाऱ्यांच्या बाजूला होता. शहरी भागात मात्र मोठी चुरस पाहायला मिळाली.

या विभागातही सत्ताधारी गटाने बाजी मारली असली, तरी विरोधी गटाच्या चार ते पाच जागा ३० ते ४० मतांच्या फरकाने गमवाव्या लागल्या. विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये  विद्यमान अध्यक्षांसह १८ संचालक, दोन माजी संचालक व नऊ नवीन संचालकांचा समावेश आहे. ॲड. रवी शिराळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

विजयी उमेदवार (कंसात मते) 
कोल्हापूर शहर- सयाजीराव आळवेकर (१२०९), सुधीर खराडे (१२८८), धवल भरवाडा (११७५), मदन पाटील (१४३७), सचिन पुरोहित (११९८), रमेश छाबडा (१२११), संजय शेटे (१२७८), प्रकाश शिंदे (११७७). भुदरगड- शिवाजी ढेंगे (१२४६). शाहूवाडी- भरतेश कळंत्रे (१२३०). चंदगड- अविनाश माने (१२३). आजरा- सोमनाथ रावजीचे (१२२६). हातकणंगले- अशोक बोरगावे (१३६३), प्रल्हाद खवरे (१३५३), भुजिंगराव भांडवले (१३५५), सचिन पाटील (१३०९), संतोष पाटील (१२९५). करवीर- रशीद पठाण (१२७०), दत्ताजीराव पाटील (१३००). शिरोळ- सुनीलकुमार हाळे (१३१८), किरण दळवी (१२६४). पन्हाळा/ गगनबावडा- किरण जाधव (१३११), सरदार पाटील (१२७६). कागल- मोहन ढेरे (१३१७), नंदकुमार पाटील (१२८८). राधानगरी- प्रकाश पाटील (१३३२), विजय बलुगडे (१३०१). गडहिंग्लज- नितीन पवडणेकर (१३३५), संदीप मिसाळ (१३२३). 

हुल्लडबाजांना चोप 

रात्री साडेनऊच्या सुमारास निवडणुकीचा कल सत्ताधारी गटाच्या बाजूने झुकत असल्याचे दिसताच त्यांच्या समर्थकांनी दसरा चौक ते शहाजी महाविद्यालय रस्त्यावर गुलालाची उधळण करीत फटाके फोडले. जवळपास तासभर हा प्रकार सुरू होता. सध्या आचारसंहिता सुरू असल्याने पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्या समर्थकांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, समर्थकांनी जल्लोष सुरू ठेवल्याने पोलिसांनी त्यांना चोप देत पिटाळले. 

Web Title: Ekata Panel wins Kolhapur District Chemist Association election