बाजार समितीची संचालक निवडणूक प्रक्रिया लांबणीवर जाणार 

घनशाम नवाथे 
Saturday, 27 February 2021

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना दिलेली तीन महिन्यांची मुदतवाढ आज संपली. सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

सांगली : येथील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना दिलेली तीन महिन्यांची मुदतवाढ आज संपली. सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. बाजार समिती सदस्य मतदार असलेल्या सोसायट्यांची निवडणूक पुढे गेल्यामुळे बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया लांबणीवर जाणार असल्याचे स्पष्ट आहे. संचालकांचे मुदतवाढीकडे लक्ष आहे. 

संचालक मंडळाची पाच वर्षाची मुदत 26 ऑगष्ट 2020 मध्ये संपली. कोरोना काळात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका 24 जुलै 2020 पासून सहा महिने पुढे ढकलल्या होत्या. परंतू संचालक मंडळाची मुदत संपल्याने 27 ऑगष्ट रोजी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. संचालकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मुदतवाढीचे आदेश दिले. सहा महिन्यांची मुदतवाढ संपल्यानंतर सभापती दिनकर पाटील यांच्यासह काहींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा मुदतवाढीचे आदेश पणन विभागाने दिले. 

संचालकांना दिलेली मुदतवाढ आज संपली. मात्र कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे समितीचे मतदार असलेल्या सोसायट्यांच्या निवडणुका पुढे गेल्या. परिणामी समितीची निवडणूक सध्या घेणे शक्‍य नाही. त्यामुळे मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. त्याकडे लक्ष लागले आहे.
 

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The election process of the market committee will be postponed