esakal | Vidhan Sabha 2019 प्रचाराच्या तोफा आज थंडावणार 
sakal

बोलून बातमी शोधा

Election Campagin

 लोकसभा, विधानसभा प्रचाराची सांगता; महिनाभर उडालेला धुरळाही बसणार.

Vidhan Sabha 2019 प्रचाराच्या तोफा आज थंडावणार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा ः लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेले महिनाभर प्रचाराच्या निमित्ताने धडधडणाऱ्या आरोप- प्रत्यारोपांच्या तोफा उद्या (ता. 19) सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. यानिमित्ताने गेले महिनाभर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात उडालेला राजकीय धुरळाही खाली बसणार आहे. जाहीर प्रचाराची सांगता शनिवारी सायंकाळी पाच वाजता होत आहे.
 
लोकसभा आणि विधानसभेच्या आठ जागांची निवडणूक एकत्रित असल्याने जिल्ह्यातील राजकीय रंगत आणखीच वाढलेली दिसत आहे. लोकसभा, विधानसभेतील महायुतीच्या उमेदवारांसाठी दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेऊन प्रचाराचा आवेग आणखी वाढविला. शिवाय, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कॉंग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा आदी नेत्यांनीही वातावरण तापविले. यामध्ये अक्षरश: आरोप- प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले.
 
लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले, आघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यात लढत होत असल्याने सहा विधानसभा मतदारसंघातील मतदारांना दोन मते द्यावी लागणार आहेत. ही काटातोड लढत असल्यामुळे प्रचारात ईर्ष्या आणि उत्साह पाहायला मिळत आहे. विधानसभेसाठीही भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस या पक्षांसह तुल्यबळ अपक्ष, बंडखोरांनीही प्रचाराचे रान पेटविले आहे. 

उद्या जाहीर प्रचाराची सांगता असल्याने या तोफा थंडावणार आहेत. 
दरम्यान, सोशल मीडियावरही खुला प्रचार करण्यासही उद्या सायंकाळपर्यंतच संधी असणार आहे. त्यानंतर अधिकृतरीत्या प्रचार करता येणार नाही. तसे करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे.

प्रचंड उत्सुकता 

जिल्ह्यातील लोकसभेसह आठही विधानसभा मतदारसंघात विद्यमानांबरोबरच विरोधकांनीही जोरदार फिल्डिंग लावली. एकतर्फी वाटणारे मतदारसंघातही ही निवडणूक अखेरच्या टप्प्यामध्ये चुरशीची ठरत आहे. साम, दाम, दंड या नीतीचा पुरेपूर वापर होत असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. 


आता खेळ "लक्ष्मी'चा 
जाहीर प्रचार संपल्यानंतर मतदारांसमोर जाऊन मतांचे आवाहन केले जाते. उद्या सायंकाळनंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार असून, सलग दोन दिवस "लक्ष्मी'चा खेळ सुरू राहणार आहे. मात्र, त्यावर निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. 

आज ठाकरे, मिटकरींच्या सभा 
उद्या माण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे हे सकाळी दहा वाजता दहिवडी (ता. माण) येथे सभा घेणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी हे सकाळी साताऱ्यात, दुपारी रहिमतपूर आणि सायंकाळी पुसेगाव येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. त्यामुळे सायंकाळपर्यंत जाहीर प्रचाराचे रान उठणार आहे.