करमाळा : डाळिंबाच्या करमाळ्यात सफरचंदाची हवा; संजयमामा विजयी! | Election Results 2019

अशोक मुरुमकर
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

Election Results 2019 : करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा विजय झाला आहे. तर माळशिरसमधून राम सातपुते यांचा विजयी झाला आहे.

सोलापूर : करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा विजय झाला आहे. तर माळशिरसमधून राम सातपुते यांचा विजयी झाला आहे. माढ्यात बबनराव शिंदे हे सहाव्यांदा आमदार झाले आहेत. 
संजय यांनी शिवसेनेच्या रश्‍मी बागल व नारायण पाटील यांचा पराभव केला आहे. लोकसभा निवडणूकीत त्यांनी माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून रिंगणात होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी न घेता विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र, राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिला होता. शिंदे यांना मताधिक्‍य जास्त आहे. मात्र, अद्याप त्यांचा विजयी जाहीर झालेला नाही. माळशिरसमधून राष्ट्रवादीचे उत्तम जानकर व भाजपचे राम सातपुते यांच्यात लढत झाली. सुरुवातील जानकर आघाडीवर होते. त्यांना मागे टाकत सातपुते आघाडीवर आले आहेत.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन रश्‍मी बागल त्यांनी जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या मदतीने शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेने आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी कापून बागल यांना उमेदवारी दिली. त्यात बागल यांचा पराभव झाला. तर अपक्ष म्हणून रिंगणात असलेले पाटील यांचाही पराभव झाला आहे. शिंदे यांना भाजपच्या वाटेवर असलेले कॉंग्रेसचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पाठींबा दिला होता. राष्ट्रवादीने संजय घाटणेकर यांना येथून उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी त्यांची उमेदवारी मागे न घेता शिंदे यांना पाठिंबा देण्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जाहीर केले होते. त्यानंतर काही दिवस घाटणेकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र पुन्हा त्यांनीही शिंदे यांचा प्रचार केला.

करमाळा मतदारसंघात माढा तालुक्‍यातील 36 गावांचा सामावेश आहे. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये शिंदे पिछाडीवर होते. मात्र, माढा तालुक्‍यातील गावांची मतमोजणी सुरु झाल्यानंतर शिंदे यांनी आघाडी घेत नारायण पाटील यांना मागे टाकले. तर करमाळा तालुक्‍यातील गावांची मतमोजणी सुरु असताना रश्‍मी बागल यांनी आघाडी घेतली होती. मात्र, काही फेऱ्यातच त्या पिछाडीवर पडल्या आणि नारायण पाटील यांनी आघाडी घेतली होती. ही आघाडी नारायण पाटील यांना माढा तालुक्‍यातील 36 गावांमध्ये राखता आली नाही. त्यात त्यांचा पराभव झाला व संजय शिंदे यांनी आघाडी घेऊन विजयी मिळवला. 

माढ्यातून बबनराव शिंदे हे सहाव्यांदा आमदार झाले आहेत. दक्षिण सोलापूर मतदारसंघात सुभाष देशमुख व उत्तर सोलापूर मतदारसंघात विजयकुमार देशमुख हे विजयी झाले आहेत. शहरमध्ये मध्ये प्रणिती शिंदे या विजयाच्या मार्गावर आहेत. अक्कलकोटमध्ये भाजपचे सचिन कल्याणशेट्टी यांचा विजयी झाला आहे. पंढरपूरमध्ये भारत भालके व मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे यशवंत माने हे विजयी झाले आहेत. यातील काही उमेदवारांच्या विजयाची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र ते विजया जवळ आहेत. अपवाद वगळता त्यांचा विजयी निश्‍चित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Results 2019 Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Solapur result